Anil Bonde : उद्धव ठाकरे यांनी मराठी- मराठी म्हणत मुख्यमंत्री असताना मराठी माणसाचा घात केला. त्रिसूत्रीत तीन भाषा जाहीर कराव्या, असा माशेलकर समितीचा अहवाल होता. माशेलकर समितीचा अहवाल रद्द करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मात्र आपलं पाप लपवण्यासाठी उद्धव ठाकरे हा सगळा प्रयत्न करत होते, आपलं पाप झाकण्याचा जर हा प्रयत्न असेल तर एक चित्रपट उबाठावर निघू शकतो, अशी खोचक टीका भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. ते नागपुरात (Nagpur) बोलत होते. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय रद्द केला, त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सत्कार करायला पाहिजे,असेही खासदार अनिल बोंडे यावेळी म्हणालेत.
नक्की वाचा : ‘संजय राऊत यांच्या बुद्धिमतेची चाचणी तिसरीत करावी लागेल’- आशिष शेलार
ग्रामीण भागातील मुलांना मराठी सोबत इंग्रजी,हिंदी का शिकवू नये ? (Anil Bonde)
नरेंद्र जाधव यांची समिती अभ्यास करेल आणि कुठल्या वर्षापासून हिंदी भाषा शिकविली जाऊ शकते यासंदर्भात अहवाल देईल. हा अतिशय चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील मुलांना समोर जायचं असेल तर जास्त भाषा त्यांना आल्या पाहिजे. शिवाय मुंबईमध्ये नेत्यांच्या मुलाना फ्रेंच, इंग्रजी शिकवतात, आमच्या ग्रामीण भागातील मुलांना मराठी सोबत इंग्रजी का शिकवू नये? हिंदी का शिकू नये? त्यांना समोर का जाता येऊ नये? असा सवाल देखील खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी उपस्थित केला.
अवश्य वाचा : १५ ऑगस्ट पासून लागू होणारा नवीन फास्टॅग राष्ट्रीय महामार्गावरच वैध
“स्वतःचं पाप झाकण्यासाठी खटाटोप करावे लागतात”(Anil Bonde)
पक्ष वाढीसाठी विजय सभा, अस्तित्व टिकवण्यासाठी विजय सभा या उद्धव ठाकरे यांना घ्यावीच लागेल. शिवाय स्वतःचं पाप झाकण्यासाठी खटाटोप करावे लागतात. मात्र यावर चित्रपट काढायला काय हरकत आहे? असा खोचक टोलाही खासदार बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.