पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आव्हाड यांनी हजारे यांच्यावर वक्तव्य केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ॲड. मिलिंद पवार यांनी राळेगण सिद्धी येथे येऊन अण्णा हजारे (legal action) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती अण्णा हजारे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर टीका केली होती. “या माणसाने देशाचं वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही”, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेवर अण्णा हजारे यांच्याकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली होती. अण्णा हजारे यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी एवढे काय कायदे केले, त्या कायद्याचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. एक झालं, माझ्या काही आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. म्हणून काहीतरी कुरापत काढायची, बदनामी करायची. पण काही फरक पडत नाही”, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी मांडली.