ANTI-CORRUPTION BUREAU : पाथर्डी: पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस (Police) शिपाई लक्ष्मण सुखदेव पोटे, पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे व आरोपी राहुल शिवाजी साबळे (अटकेत असलेला) या तिघांविरोधात एका हॉटेलचालकाकडून पंधराशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ANTI-CORRUPTION BUREAU) नाशिक युनिटच्या सापळा कारवाईत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून शिपाई लक्ष्मण पोटे याला अटक करण्यात आली आहे, तर पोलीस नाईक सोनवणे हा लाचेच्या रकमेसह पसार झाला आहे.
नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या
पंधराशे रुपयांची मागितली होती लाच
तक्रारदाराचे मिसळचे हॉटेल रात्री दहानंतर चालू ठेवले जाते, यावर कारवाई नको असेल तर मासिक हप्ता दोन हजार रुपये द्यावा लागेल, असे सांगून आरोपी शिपाई पोटे याने तडजोड करून पंधराशे रुपयांची लाच मागितली होती. ही तक्रार १५ जून रोजी लाचलुचपत विभागाकडे दिल्यानंतर पडताळणी दरम्यान लाचेची मागणी निश्चित झाली. १७ जून रोजी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात पोटे यांनी वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या पोलीस कोठडीतील आरोपी राहुल साबळे याच्याकडून तक्रारदाराकडे लाच रक्कम घेण्यास सांगितले. साबळे याने तक्रारदाराकडून पंधराशे रुपये घेतले आणि ते पोलीस नाईक सोनवणे याच्याकडे सुपूर्त करत असताना सोनवणे हा लाचेच्या रकमेसह घटनास्थळावरून पसार झाला.
अवश्य वाचा : निराधार बालकांना आधार कार्ड मिळणार
आरोपीला घेतले ताब्यात (ANTI-CORRUPTION BUREAU)
या कारवाईत आरोपी लक्ष्मण पोटे याला ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस नाईक सोनवणे व आरोपी साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींच्या ताब्यातून पोटे याचा वापरता मोबाईल व साबळे याचे शर्ट-पँट जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू आल्हाट (लाचलुचपत विभाग, अहिल्यानगर) करत आहेत.