
Arun Aher : नगर : अहिल्यानगरमधील प्रसिद्ध शाहीर (Shahir) अरूण भिकाजी आहेर (Arun Bhikaji Aher) (वय ७४) यांचे दीर्घ आजारानंतर आज (ता. १२) त्यांच्या घरी दुपारी १ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोककला, राष्ट्रसेवा दल व सामाजिक कला भान ठेऊन शांतीकुमार फिरोदिया फाउंडेशनच्या (Shantikumarji Firodia Memorial Foundation) सहकार्यातून त्यांनी नुकताच “कला साधकांचा – नगरी आहेर” हा ११४४ पानी ग्रंथ साकारला होता. त्यांच्या निधनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
सार्वजनिक बांधकाम विभागात आरेखक पदावर नोकरी
सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अधिकारी होते. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात आरेखक पदावर नोकरी केली होती. त्यांनी रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे २९ वर्षे जिल्हाध्यक्ष व नंतर महाराष्ट्र प्रांतिक प्रभारी अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागात प्रतिनियुक्तीवर असताना तयार केलेल्या मतदारसंघाच्या नकाशाबद्दल तत्कालीन केंद्रीय निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांच्याकडून त्यांचे कौतूक करण्यात आले होते.
नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल
चर्मकार महासंघाचे पहिले शहराध्यक्ष (Arun Bhikaji Aher)
महाराष्ट्र चर्मकार महासंघाचे नगरचे पहिले शहराध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. गटई कामगारांना परवाना, टपरी निवारा यांसह विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न, समाज संघटनात ५० वर्षे योगदान, वधू-वर-पालक परिचय मेळाव्याचे प्रत्येक वर्षी आयोजन, राष्ट्र सेवा दलाचे संस्कारक्षम कार्यकर्ता म्हणून राज्यातील विविध ठिकाणच्या शिबिरांत सक्रिय सहभाग, स्वर्गीय एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, भाऊसाहेब रानडे, ग. प्र. प्रधान, शाहीर लीलाधर हेगडे, वसंत बापट, डॉ. बाबा आढाव, सदानंद वर्दे यांच्यासोबत काम, आचार्य विनोबा भावे यांच्या सहवासात पवनार आश्रमात काही काळ वास्तव्य, भूदान, गोहत्याबंदी, एक गाव एक पाणवठा या चळवळींमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.
राष्ट्र सेवा दल कालपथकाचा शाहीर म्हणून लोकरंजनातून लोकशिक्षण उपक्रमात ६० वर्षांपासून ते कार्यरत होते. नगर जिल्हा वारकरी सेवा संघाची स्थापना त्यांनी केली. या संघटनेचे संस्थापक सचिव म्हणून वारकऱ्यांच्या प्रश्नावर लढा दिला. अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरातील देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीचे व्यवस्थापक म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम पाहिले.
पुरस्कार व सन्मान
- महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे यशस्वी नेतृत्व सन्मान – १९९९
- सर्वजनिक बांधकाम विभाग गुणवंत कर्मचारी सन्मान – २००४
- लोकविचारधारा या व्यासपीठातर्फे उत्कृष्ट कामगार पुरस्कार – १ मे २००८
- अहमदनगर चर्मउद्योग औद्योगिक संस्थेचा समाजभुषण पुरस्कार – २००९
- प्रतिबिंब या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व सेवाभावी संस्थेतर्फे उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार
- राष्ट्रसेवा दलाचा सर्जनशील, संस्कारक्षम कार्यकर्ता म्हणून राष्ट्रीय सन्मान – २०११
- पं. राम मराठे स्मृती संगीत स्पर्धा (तळेगाव दाभाडे) राज्यस्तरीय प्रथम क्रमांक – २०१२
- वैष्णव मित्रमंडळाचा जाणिव जीवनगौरव पुरस्कार – २०१२
- प्रियदर्शनी प्रतिष्ठान अहमदनगर व महाराष्ट्र राज्य शाहीर परिषदेतर्फे शाहीर महाराष्ट्राचा सन्मान – २०१५
- महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार – २०१७
- राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे समाजभूषण पुरस्कार – २०१७
- आर.के. सोनग्रा प्रकाशनतर्फे (पुणे) राज्यस्तरीय प्रबुद्ध नायक साहित्य सन्मान – २०२२
- संघर्ष प्रतिष्ठान सावेडीतर्फे साहित्यरत्न पुरस्कार – २०२३


