नगर : काही दिवसांपूर्वी ‘आशा’ चित्रपटाचा (Asha Movie) टीझर प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या ‘बाई अडलीये म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. त्यात रिंकू राजगुरू (Rinku Rajguru)साकारत असलेली आशा सेविका सायकलवर बसून गावागावांतील लोकांपर्यंत पोहोचते, अशी काही झलक दाखवण्यात आली होती. आता या चित्रपटाचा टेलर प्रदर्शित (Trailer Release) झाला आहे.
आशाच्या संघर्षाला ऊर्जा देणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा डॉ. ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ साहित्यिक आणि ९९ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि लोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष मंजू मंगलप्रभात लोढा आदी मान्यवरांसह ‘आशा’ सेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.
नक्की वाचा: ‘रोलेक्स’च्या घडाळ्यांना जगभरात इतकी मागणी का? वाचा सविस्तर…
ट्रेलरमध्ये नेमकं काय? (Asha Movie Trailer)
महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून उलगडत जातो. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसतात. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणे, कुटुंबातील ताण तणावांना सामोरं जाणं, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्याची न थकणारी धडपड. तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ ट्रेलरमध्ये स्पष्टपणे जाणवते.
अवश्य वाचा: साधू-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सवाल
‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित (Asha Movie Trailer)
रिंकूसह सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या भूमिका चित्रपटाला अधिक मजबुती देतात. ‘आशा’ ही केवळ एका सेविकेची कथा नाही, तर सर्व स्तरांवर दररोज लढणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे, हेच चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरते. ‘आशा’ हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



