Ashok Kharat| नगर : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) यांच्यावर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्याकडील पेनड्रायव्हमध्ये ५८ व्हिडीओ सापडले. हे प्रकरण राज्यभर गाजत आहे. मात्र, तुम्हा माहिती आहे का, या प्रकरणाच्या तपासात अहिल्यानगरचा (Ahilyanagar) मोठा संबंध आहे.
हे वाचा – आश्वासनानंतर लोणी व्यंकनाथ येथील ‘रास्ता रोको’ मागे
राजकीय नेत्यांचा तो गुरू
अशोक खरात हा राजकीय वर्तुळातील अंक ज्योतिषातील व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक राजकीय नेत्यांचा तो गुरूही असल्याचे आरोप सध्या होत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे ते गुरू असल्याचे सांगितले जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार निलेश लंके यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांचे त्यांच्या बरोबर फोटो आहेत. असा हा राजकीय नेत्यांच्या गराड्यातील राजज्योतिषावर अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी पहिल्यांदा विरोधात बातमी केली होती. या बातमीत खरातवर गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांबाबत रुपाली चाकणकर यांनी खुलासा मागितला होता, असा आरोप खेमनर यांनी केला आहे. या प्रकरणानंतर एक वर्षांनी अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आता त्याच आरोपांचा गुन्हा दाखल झाला आहे.
अवश्य वाचा- वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
खरातचा ऑफीस बॉय आरोपी
पीडित महिलेला आक्षेपार्ह व्हिडिओ खरातचा ऑफीस बॉय असलेल्या नीरज जाधव याने पाठवविला होता. या प्रकरणी १८ फेब्रुवारीला शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. या पथकाच्या प्रमुखपदी महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सातपुते या अहिल्यानगरच्या कन्या आहेत.
लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल
राज्य गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, अशोक खरात यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा तपास आता एसआयटी एकत्रितपणे करणार आहे. महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत. अशोक खरात यांच्याविरुद्ध नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तर नाशिक ग्रामीणमधील वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खरातवर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. सध्या त्याच्या घराची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात एका पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पहा – 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: दिवस दुसरा, माती गट
मिरगाव येथील फार्म हाऊसच्या झडतीदरम्यान पोलिसांना एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे सापडली आहेत. ती पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अशोक खरातचे धाबे दणाणले असून, तपासात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरातील पिस्तूल आणि काडतुसे कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. कोट्यवधींची संपत्ती, शिर्डी, पाथर्डीतही जमीन मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत अशोक खरात याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केल्याची चर्चा आहे. नाशिक शहरात त्याचा आलिशान बंगला आणि कार्यालय असून पाथर्डी परिसरात सुमारे ३० एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सिन्नर, ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथेही त्याची मोठ्या प्रमाणात जमीन असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. एकूणच जवळपास २०० कोटी रुपयांची संपत्ती त्याने उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.



