नगर: भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) याचे अनेक कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. त्यातच आता त्याने सख्ख्या नातलगांनाही गंडविल्याचा (Swindled close relatives) धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. याशिवाय खरातने समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत परिवहन विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या नावे खाते उघडून त्यातून लाखोंचे आर्थिक व्यवहार केले. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आणखी १३ खात्यांतून ७ कोटींची उलाढाल त्याने केली.
समता पतसंस्थेत खरातने ५७ व्यक्तींच्या पॅन व आधार कार्डचा वापर करून शंभर खाती उघडून त्यात ६० कोटींचा व्यवहार केला आहे. यातील २६ व्यक्तींनी पॅन, आधार आपलेच असून खाते उघडण्यासाठी केलेल्या सह्या मात्र आपल्या नसल्याचा जबाब दिला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात शिर्डी पोलिसांनी खरात विरोधात दाखल गुन्ह्यांच्या तपासाला वेग दिला आहे.
नक्की वाचा: चुकीचा नंबर डायल केल्याने ४० हजारांचा फटका;नक्की काय घडलं?
शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिका-यांचीही खरातकडून फसवणूक (Ashok Kharat Case)
प्रामुख्याने समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील १०० खात्यांची पडताळणी पूर्ण केली जात असून त्या चौकशीत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सामान्य भक्तच नव्हे तर शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिका-यांचीही खरातने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. परिवहन विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या नावे तीन खाती समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत असून त्यावर सुमारे दीड कोटीचे व्यवहार खरातने केल्याचे समोर आले आहे. सख्ख्या नातलगांची कागदपत्रे वापरून खरातने समता पतसंस्थेत खाती उघडली. या खात्यात सुमारे एक कोटीचा आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले.
अवश्य वाचा: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जय पवार यांचं सूचक वक्तव्य
महाराष्ट्र आणि पंजाब नॅशनल बँकेलाही पत्र (Ashok Kharat Case)
भोंदू अशोक खरात हा राहाता परिसरातील महाराष्ट्र आणि नाशिकमधील पंजाब नैशनल बँकेतील काही खात्यांना नॉमिनी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याची पडताळणी करण्याकरीता पोलिसांनी या दोन्ही बँक व्यवस्थापनाला पत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितले. संत नागेबाबा, राहाता पीपल्स, स्वामी विवेकानंद आणि बुलडाणा अर्बन बँकेकडेही पोलिसांनी खरात नॉमिनी असलेल्या खात्यांची माहिती मागविली असून ती अजून पोलिसांना मिळाली नाही.



