Ashutosh Kale : कोपरगाव : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा (Illegal Sand Mining) व वाहतूक खुलेआम सुरू असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तसेच शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांच्याकडे वाळूतस्करांविरोधात तत्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अवश्य वाचा: उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
महसूलकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने नाराजी
मागील आठवड्यात आमदार आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेऊन अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतर महसूल प्रशासनाकडून अपेक्षित व ठोस कारवाई न झाल्याने आमदार काळे यांनी नाराजी व्यक्त केली. आज बुधवारी जिल्हाधिकारी पंकज आशिया हे कोपरगाव दौऱ्यावर आले असता आमदार काळे यांनी थेट त्यांच्या समोर वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित केला.
नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव
यावेळी आमदार काळे यांनी सांगितले की, (Ashutosh Kale)
अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे तसेच कोपरगाव शहर आणि तालुक्यातील रस्ते अवजड वाहतुकीमुळे खराब होत आहे त्यामुळे महसूल, पोलीस व संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करून वाळूतस्करी पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली. याचबरोबर कोपरगाव शहरात प्रस्तावित असलेल्या विविध व्यापारी संकुलांबाबतही आमदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. शासनाच्या मालकीच्या जमिनींवरील अनेक करार संपुष्टात आले असून, नवीन करार व नियमांबाबत स्पष्ट निर्णय घेऊन विकासकामांना गती देण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी कोपरगाव तहसील कार्यालय येथे विविध शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच कोपरगाव नगरपरिषदेच्या नूतन इमारतीच्या शेजारी सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या जागेचीही पाहणी करण्यात आली. या दौऱ्यादरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी विविध स्थानिक प्रश्न व समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यावर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोपरगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार काळेंच्या ठाम भूमिकेमुळे वाळूतस्करीविरोधात लवकरच ठोस कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



