Asian Champions Trophy 2023 :भारतीय महिला हॉकी संघांची कमाल ; एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी  

भारताच्या महिला संघाने जपानवर ४-० अशी मात करत एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२३ मध्ये थेट चषकावर आपलं नाव कोरलं आहे

0

नगर : भारतीय महिला हॉकी संघाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२३ मध्ये (Asian Champions Trophy 2023) दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाला (Gold Meadal) गवसणी घातली आहे. रविवारी (ता.५) एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानला पराभूत करत त्यांनी हे सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताच्या महिला संघाने जपानवर ४-० अशी मात करत थेट चषकावर आपलं नाव कोरलं आहे. रविवारी रांचीच्या मरंग गोमके येथील जयपाल सिंह अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर हा अंतिम सामना पार पडला.

नक्की पहा : मोठी बातमी ! हार्दिक पांड्या विश्वचषकातून बाहेर

भारतीय महिला संघाने दुसऱ्यांदा हा चषक उंचावला आहे. यापूर्वी उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियावर २-० अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती. झारखंडची राजधानी रांची येथील मारंग गोमके जयपाल सिंह अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर भारत आणि जपानमधील अंतिम सामना खेळवण्यात आला होता.

हेही पहा:  सुपरस्टार कमल हासनच्या ‘इंडियन-2’ चा टीझर प्रदर्शित 

अंतिम सामन्यात भारताकडून संगीता कुमारी हिने १७ व्या मिनिटाला गोल करून भारताचं खातं उघडलं. त्यानंतर  ४६ व्या मिनिटाला नेहाने आणि ५७ व्या मिनिटाला लालरेमसिआमीने गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. ६० व्या मिनिटाला वंदना कटारिया हिने भारतासाठी चौथा गोल केला. मात्र जपानच्या कोणत्याही खेळाडूला गोल करता आला नाही. या चार गोलसह भारताने जपानवर ४-० अशी मात केली. जपानला या सामन्यात अनेक पेनल्टी शूटआऊट मिळाले होते. परंतु, संघाच्या मदतीने गोलकिपर सविता पुनियाने जपानी खेळाडूंच्या सर्व पेनल्टी अपयशी ठरवल्या आणि एकही गोल होऊ दिला नाही.

भारतीय हॉकी संघाने मिळवलेल्या या विजयानंतर हॉकी इंडियानं ट्वीट करून प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. यासोबतच सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला दीड लाख रुपये दिले जातील असं देखील सांगण्यात आले आहे.