Attempt to kill : कर्जत: गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करताना तहसीलदार (Tehsildar) रवी सतवन यांच्यासह त्यांच्या शासकीय वाहनांसह पथकावर वाळूचा टिपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. तसेच वाहन आडवे लावत शासकीय वाहनांस अडथळा निर्माण करणे याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) अजय अशोक गोरे आणि आकाश अशोक गोरे (दोन्ही रा.मिरजगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाळू तस्करांच्या या मुजोरीने पुन्हा एकदा शासकीय विभागात खळबळ उडाली.
अवश्य वाचा: दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’
टिपर अडवला असता रस्त्यावरच खाली केली वाळू
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.१७) सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास कर्जतचे तहसीलदार रवी सतवन, नायब तहसीलदार मोहसीन शेख, कुळधरण मंडळ अधिकारी धुलाजी केसकर हे तहसील कार्यालयाच्या शासकीय वाहनात कर्जत-वालवड रस्त्यावर गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना वालवड रोडलगत असलेल्या हॉटेल साईच्या समोर रस्त्यावर अनाधिकृत वाळू वाहतूक करणारा टिपर मिळून आला. सदरचा वाळूने भरलेला टिपर अडवला असता टिपरवरील वाहन चालक अजय अशोक गोरे (मिरजगाव ता. कर्जत) याने तात्काळ टिपरमधील वाळू रस्त्यावरच खाली केली. आणि पथकाच्या शासकीय वाहनावर टिपर घालत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
नक्की वाचा : महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पळून जाण्यात यशस्वी (Attempt to kill)
टिपर कर्जतच्या दिशेने वेगात निघाला असता तहसीलदार रवी सतवन यांनी शासकीय वाहनाने त्याचा पाठलाग सुरू ठेवला. यावेळी आकाश अशोक गोरे हा खाजगी वाहनाने पथकास टिपरचा पाठलाग करीत असताना वाहनाचा अडथळा आणून अडविण्याचा प्रयत्न करीत होता. टीपर चालकाने कर्जतच्या दिशेने जाताना डाव्या बाजूस असणाऱ्या महावितरणच्या केव्ही १३२ विद्युत उपकेंद्राच्या बाजूने टिपर थांबवला असता तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने त्यास घेराव घातला. कर्जतचे तहसीलदार रवी सतवन यांनी टिपरच्या चालक अजय गोरे यास वाहन थांबविण्यासाठी सांगितले असता त्याने सतवन यांच्या अंगावर टिपर घालत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सतवन यांनी प्रसंगावधान राखत त्यातून स्वतःचा बचाव केला. टिपर वालवडच्या दिशेने वेगात निघाला असता पुन्हा तहसीलदार सतवन आणि त्यांच्या पथकाने पाठलाग सुरूच ठेवला. टिपर गायकरवाडी मार्गे कच्च्या रस्त्याने जाताना महावितरणच्या विद्युत वाहक तारा तोडून त्यांचे नुकसान केले त्यामुळे तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.
खाली केलेल्या वाळूचा रीतसर पंचनामा करून मंडळ अधिकारी धुलाजी केसकर यांच्या फिर्यादीवरून टिपर चालक अजय अशोक गोरे आणि थार गाडीचालक आकाश अशोक गोरे (दोन्ही रा.मिरजगाव, ता.कर्जत) यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामकाजात अडथळा आणणे यासह अनधिकृत गौण खनिज उत्खनन त्याची चोरी व वाहतूक करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.



