नगर : विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यफेरीतील सामना काल (गुरूवारी) ऑस्ट्रेलिया (Australia) व दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना रविवारी (ता. १९) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळविला जाणार आहे.
हे देखील वाचा : ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेंतर्गत कारागिरांना आता बॅंकेतून मिळणार अर्थसहाय्य
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेचे (Australia Vs South Africa) फलंदाज बाद होत राहिले. डेव्हिड मिलर (१०१ धावा) व हाइनरिक क्लासेन (४७ धावा) यांनी केलेल्या ९५ धावांच्या भागिदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या उभी करता आली. डेव्हिड मिलरने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला. मात्र, त्याला क्लासेन व्यतिरिक्त कोणीही साथ दिली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण संघाने ४९.४ षटकांत २१२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले.
नक्की वाचा : मनोज जरांगेची मोठी घोषणा ; २४ डिसेंबरनंतर ‘या’ ठिकाणी आंदोलन सुरु
२१३ धावांचे छोटे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली. मात्र, नंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. प्रत्येक धावेसाठी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा भेदक मारा ऑस्ट्रेलिया (Australia) विजयापासून रोखू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने ४८ चेंडूंत ६२ धावा करत ऑस्ट्रेलियाचा विजयाचा मार्ग सुखकर केला. दक्षिण आफ्रिका (South Africa)कडून जेराल्ड कोएत्झी व तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा हेड सामनावीर ठरला.
सात वेळा ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये
ऑस्ट्रेलियाचा संघ आत्तापर्यंत सातवेळा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यातील केवळ दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदा वेस्ट इंडिजच्या विरुद्ध आणि दुसऱ्यांदा १९९६च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या विरुद्ध त्यांना फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. उर्वरित सर्व सामने त्यांनी जिंकले आहेत. भारतालाही त्यांनी २००३मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते. मात्र, भारताचा सध्याचा संघ अधिक बलाढ्य आहे. शिवाय प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये आहे. साखळी सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाला हरविले होते. त्यामुळे रविवारी (ता. १९) होणारा अंतिम सामना चुरशीचा होणार आहे.