नगर : विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया (Australia) व दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाचा तब्बल १३४ धावांनी पराभव केला. यंदाच्या विश्वचषक स्पर्थेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा पराभव आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर जोडीने शतकी भागीदारी केली. टेंबा बावुमा (३५ धावा) बाद झाल्यावर क्विंटन डी कॉटने एडन मार्करमच्या (५६ धावा) साथीने संघाला मोठी धाव संख्या उभारून दिली. क्विंटन डी कॉट याने ८ चौकार व ५ षटकारांच्या सहाय्याने १०६ चेंडूंत १०९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने ५० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ३११ धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क व ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
३१२ धावांचे मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा मार्नस लॅबशॅनने (४६ धावा) केल्या. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४०.५ षटकांत १७७ धावाच जमवू शकला. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने तीन फलंदाज बाद केले. शतकवीर क्विंटन डी कॉट सामनावीर ठरला. विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा केलेला हा सर्वात मोठा पराभव आहे.