नगर : समाज परिवर्तनासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.बाबा आढाव (Dr. Baba Adhav) यांची प्राणज्योत (Death) मालवली आहे. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र काल ८ डिसेंबरला त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बाबा आढाव नेमके कोण होते? जाणून घेऊयात..
नक्की वाचा: मोठी बातमी! MPSC ने २१ डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली
बाबा आढाव नेमके कोण ? (Baba Adhav)
असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून बाबा आढाव यांना ओळखलं जातं. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कामगार संघटना आणि वंचितांच्या हक्कांसाठी समर्पित केलं आहे. बाबासाहेब पांडूरंग आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असूनही, त्यांचे मन हे पूर्णपणे समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले होते. लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात ते वाढले होते. सार्वजनिक संघर्षाचा त्यांचा पहिला निर्णायक टप्पा १९५२ च्या दुष्काळात आला, जेव्हा त्यांनी धान्याच्या वाढत्या किमती आणि तुटपुंज्या शिधावाटपाविरोधात सत्याग्रह केला.
अवश्य वाचा: सक्षम ताटे हत्या प्रकरणात मोठा खुलासा,मामिडवार कुटुंबाची धर्मांतराची ऑफर
असंघटित कामगारांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांनी १९५५ मध्ये हमाल पंचायतीची स्थापना केली. ही असंघटित कामगारांना संघटित करण्याची देशातील एक मोठी चळवळ ठरली. २ ऑक्टोबर १९७४ रोजी त्यांनी ‘कष्टाची भाकर’ योजना सुरू केली, ज्यामुळे हमाल समूहाला स्वस्तात पौष्टिक अन्न उपलब्ध झाले. ही योजना पुढे श्रमिक कल्याणाचे एक मॉडेल ठरली. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही महत्वाची चळवळ सुरू केली, जी अत्यंत गाजली. त्यांनी दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही काम केले.
बाबा आढाव यांचं अहिल्यानगरशी होते खास कनेक्शन

आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याशी देखील त्यांचं जवळच नातं राहिलेले आहे. अहिल्यानगर शहरात त्यांनी शंकरराव घुले यांच्या मद`तीने मार्केटयार्ड परिसरात हमाल पंचायत स्थापन केली होती. १९७० च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही त्यांनी काम केले.अंधश्रद्धाविरोधी लढा, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी यांसारख्या अनेक जनआधारित व अहिंसात्मक आंदोलनांसाठी त्यांची ओळख होती.
आढाव यांनी सामाजिक विषयांवर आणि आपल्या चळवळींवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये ‘एक गाव – एक पाणवठा’,त्यांचे आत्मचरित्रात्मक लेखन ‘मीच तो माणूस’ आणि ‘एक साधा माणूस’, ‘जगरहाटी’, ‘रक्ताचं नातं’, ‘असंघटित कामगार : काल, आज आणि उद्या’, ‘जातपंचायत: दाहक वास्तव’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक चिंतन’ ही काही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. मात्र बाबा आढाव यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.



