Bailpola : अकोले: पद्मश्री राहीबाई पोपेरे (Padmashri Rahibai Popere) यांनी आपल्या गोठ्यातील लाडक्या बैलजोडीसह उत्साहात बैलपोळा (Bailpola) सण साजरा केला. आदिवासी (Adivasi) भागातील बहुसंख्य शेती छोट्या-छोट्या खाचरांमध्ये विखुरलेली असल्याने या भागामध्ये बैलजोडीशिवाय शेती करणे अशक्य असते. यांत्रिकीकरणामुळे गावोगावी बैलपोळा सण नावालाच साजरा होत आहे. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बहुसंख्य गावातून बैलजोड्या हद्दपार झाल्या आहेत.
अवश्य वाचा : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी : सुजय विखे पाटील
पारंपरिक पद्धतीचे बैलजोडीवर साज
अशाही परिस्थितीत आदिवासी भागात शेतकरी आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी डांगी प्रजातीच्या दर्जेदार बैलजोड्या संगोपन करत असतो. पद्मश्री राहीबाई व त्यांचे कुटुंब सुद्धा डौलदार बैलजोडीचे संगोपन करत आहे. बैलपोळा सणानिमित्त बैलांची विशेष काळजी घेत त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी लाडक्या बैलजोडीला सुंदर पद्धतीने सजवले होते. पारंपरिक पद्धतीचे साज बैलजोडीवर चढवून त्यांना सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते. पाठीवर सुंदर झूल टाकून आपल्या लाडक्या सर्जा राजाची त्यांनी गावातून मिरवणूक काढली होती. बैलपोळ्यानिमित्त सर्वच शेतकरी बांधव एकत्र येऊन पारंपरिक वाद्यांसह बैलांची मिरवणूक काढत असतात.
नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज
कुटुंबियांसहित बैलजोडीची पूजा (Bailpola)
पद्मश्री राहीबाई यांनी स्वतःच्या हाताने बैलजोडीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला होता. गावभर मिरवणूक काढल्यानंतर नैवेद्य दाखवून बैलजोडीची पूजा त्यांनी आपल्या कुटुंबियांसहित केली. मुक्या प्राण्यांची विशेष आवड असलेल्या राहीबाई यांनी गेली 40 वर्ष आपल्या गोठ्यामध्ये बैलजोडीचा सांभाळ केलेला आहे. यापूर्वी राहीबाई यांनी ऊस तोडणीचे काम केले असल्याने बैलजोडीनेच त्यांनी तोडलेल्या उसाची वाहतूक केलेली आहे. डांगी प्रजातीचे बैल जास्त पर्जन्यमान असलेल्या भागासाठी व भात खाचरात उतरून काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आदिवासी भागाचे वैभव असलेल्या डांगी प्रजातीच्या बैलांचे संगोपन करण्याचे विशेष आवाहन त्यांनी पोळ्यानिमित्त शेतकरी बांधवांना केले आहे.