Balasaheb Thorat : संगमनेर : देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. महाराष्ट्रात झालेली फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडले नाही. ईडी (ED), सीबीआय सह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्यायव्यवस्थेवरील दबाव सर्वत्र अस्थिरता यामुळे देशात भाजप (BJP) विरोधी मोठी लाट असून त्यांना २०० सुद्धा जागा मिळणार नाहीत तर राज्यात महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसून महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत असल्याने ४० पेक्षा जागा नक्की मिळतील, असा विश्वास व्यक्त करताना सर्वांच्या संपर्कातील भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchore) यांची मशाल चिन्ह घरोघर पोहोचवा, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे.
हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Balasaheb Thorat)
खांडगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा प्रारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, नांदेड येथील प्रा. यशपाल भिंगे, बीडचे दादासाहेब मुंडे, बाबासाहेब ओहोळ, रणजीत सिंह देशमुख, हिरालाल पगडाल, मिलिंद कानवडे, उत्तमराव घोरपडे, राष्ट्रवादीचे ज्ञानदेव गायकर, शिवसेनेचे अमर कतारी ,संजय फड, ॲड.साळकट ,कैलास वाकचौरे ,आरपीआयचे किरण रोहम ,राजू खरात, संजय खामकर आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा : अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींची सुटका
आमदार थोरात म्हणाले की (Balasaheb Thorat)
पंतप्रधानांनी भाषण करताना दहा वर्षांत केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षांत करावयाची कामे याचा अहवाल जनतेला दिला पाहिजे. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे धर्माचे राजकारण करत आहेत. देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. न्यायव्यवस्था दबावात आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाला आहे. देशासाठी ऑलिम्पिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंवर अन्याय झाला. मात्र, पंतप्रधानांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सर्वत्र अस्थिरता आणि अनागोंदी आहे. देशाच्या इतिहासात भाजपचा कालखंड हा काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल. तर महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडाफोडी आणि पक्षासह चिन्ह काढून घेणे हे जनतेला पचनी पडले नाही. त्यामुळे महायुतीबद्दल प्रचंड रोष आहे. राज्यात महाविकास आघाडीला मोठे अनुकूल वातावरण आहे. शिर्डी व नगरसह राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून जनतेच्या सदैव संपर्कातील वाकचौरे यांचे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, देशात भाजप विरोधी मोठी लाट निर्माण झाली आहे. मोदींच्या कार्यकाळात सर्व क्षेत्रात मोठे अपयश आले आहे. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही निर्माण झाली आहे.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, दोन कोटी नोकऱ्या देणाऱ्या भाजप सरकारने देशांमध्ये मोठी बेरोजगारी निर्माण केली आहे. गांधी परिवाराचा देशासाठी मोठा त्याग आहे. महागाईमुळे महिलांना मंगळसूत्र विकण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती भाजपने आणून ठेवली असल्याची टीका त्यांनी केली. याप्रसंगी दादासाहेब मुंडे, यशपाल भिंगे, हिरालाल पगडाल, ज्ञानदेव गायकर, अमर कतारी, सचिन दिघे, मिलिंद कानवडे आदींसह विविध मान्यवरांची भाषणे झाली. याप्रसंगी तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी युवक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचितला मतदान म्हणजे भाजपला मदत
वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना काँग्रेसने मोठी संधी दिली. आपल्याकडे कायम त्यांचा सन्मान होता. राज्यात आणि देशपातळीवरही काम करण्याची संधी होती. शिर्डी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आपण मोठा प्रयत्न केला हे सर्वांना माहीत आहे. मात्र रूपवते यांनी काँग्रेस सोडणे हे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे, अशी टीकाही काँग्रेस नेते आमदार थोरात यांनी केली.