Bhandardara : अकोले : तालुक्यातील भंडारदरा (Bhandardara) धरणाच्या पाणलोटात असलेल्या लव्हाळवाडीला ‘मधाचे गाव’ (Honey Village) बनवण्यासाठी खादी ग्रामोद्योग महामंडळाने (Khadi and Village Industries Commission) पुढाकार घेतला असून मध केंद्र योजनेंतर्गत जनजागृती मेळावा घेण्यात आला.
नक्की वाचा : मनोज जरांगेंचा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा
खादी ग्रामोद्योग महामंडळाचा पुढाकार (Bhandardara)
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य असून निसर्गाचा मोठा ठेवा या अभयारण्यात लपलेला आहे. या निसर्गातील खजिन्याचा आदिवासी बांधवांना पुरेपूर उपयोग व्हावा, म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील खादी ग्रामोद्योग महामंडळाने पुढाकार घेतला आहे. शासनाच्या विविध योजना या आदिवासी बांधवांना माहितच होत नाहीत. त्याचा फायदा आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचाव्यात, आदिवासी बांधवांना त्यांच्या परिसरात रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून लव्हाळवाडीमध्ये मध योजनेंतर्गत जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच रावजी मधे हे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाळे, बाबासाहेब ठोसर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, पर्यवेक्षक वसंत चौधरी, शेळके, अर्जुन खोडके, कुशाबा पोकळे, राजू कानवडे, तुकाराम धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हे देखील वाचा: नारायण राणेंना भाजपने त्यांची जागा दाखवली – विनायक राऊत
शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन (Bhandardara)
लव्हाळवाडी हे गाव पाणलोटात डोंगरदर्यात वसलेलं असून सभोवताली निसर्गाचा मोठा खजिना लपलेला आहे. या गावातील नागरिकांचे जनजीवन उंचावण्यासाठी मनोलीचा युवाशक्ती ग्रुप कायम पुढाकार घेत असतो. या ग्रुपमधील बाळासाहेब वाळे व बाबासाहेब ठोसर यांनी लव्हाळवाडीच्या समस्या खादी ग्रामोद्योग मंडळंच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांनीही पुढाकार घेत या गावातील नागरिकांसाठी मध केंद्र योजनेंतर्गत तत्काळ जनजागृती मेळावा या वाडीत घेतला. या जनजागृती मेळाव्यात नागरिकांना मधुमक्षिकापालन, मध संकलन यावर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. भंडारदरा हे पर्यटनस्थळ असल्याने मध विक्रीसाठी मोठे ठिकाण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर आपल्याच परिसरात मध विक्री न झाल्यास त्याचे शासन कसे खरेदी करते याविषयीही माहिती देण्यात आली. अकोले येथील मधुमक्षिका पालन केंद्राचे चालक राजू कानवडे व तुकाराम धुमाळ यांनीही आदिवासी भागात मध विक्रीचा व्यवसाय कसा चांगला होऊ शकतो, मध व्यवसाय करण्यासाठी हा भाग कसा चांगला आहे, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर सखोल माहिती दिली. आदिवासी बांधवांनी शासनाच्या या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खादी ग्रामोद्योग मंडळाकडून करण्यात आले. या जनजागृतीच्या मेळाव्यासाठी एकूण ९२ नागरिकांनी सहभाग नोंदवला.