Bhausaheb Kambale | श्रीरामपूर : विधानसभा मतदारसंघात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kambale) हे शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभा अचानकपणे रद्द झाली. त्यासाठी पडद्याआड मोठ्या हालचाली घडल्याची चर्चा श्रीरामपूर शहरात सुरू आहे. यानंतर कांबळे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर जिल्ह्यातील नेत्यांचा दबाव असून आता मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले तरी निवडणूकीतून मी माघार घेणार नाही, असे स्पष्ट करत व्हीलचेअरवरून पुन्हा आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
अवश्य वाचा: संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार
भाऊसाहेब कांबळेंची कोंडी (Bhasaheb Kambale)
श्रीरामपूर विधानसभा जागा ही शिवसेनेची असून कांबळे हे सेनेचे उमेदवार आहेत. त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. मात्र, ही जागा आमदार लहू कानडे यांनी अचानकपणे महायुतीत जाऊन राष्ट्रवादीकडून मिळवली. त्यामुळे कांबळेची कोंडी झाली. तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा येथे आयोजित केली होती.परंतु ती सभा अचानक रद्द करून पुढे ३-४ दिवसांनी घेऊ, असा निरोप मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना मिळाला.
नक्की वाचा: दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे
मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली होती टीका (Bhasaheb Kambale)
राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही भाऊसाहेब कांबळे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे सडकून टीका केली होती. तसेच उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगूनही अर्ज मागे न घेतल्याबद्दल प्रचारात माझे फोटो कांबळे यांनी वापरू नये, असेही त्यांना बजावले होते. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी कानडे हेच आपले उमेदवार असल्याचे सांगितले. त्यांनतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोमवारच्या दौऱ्याची मोठी आशा होती. मात्र , अचानक काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची श्रीरामपूर येथील नियोजित प्रचार सभा रद्द केली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार असलेल्या भाऊसाहेब कांबळे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना श्रीरामपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. आज पत्रकार परिषद घेऊन कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी कांबळे म्हणाले की, मला वरच्या नेत्यांकडून उमेदवारीसाठी कुठलीही अडचण नाही. परंतु जिल्ह्यातील नेते दबावाचे राजकारण करत आहेत. त्यांच्यामुळेच मुख्यमंत्र्यांची कालची सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. माझ्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आल्याने माझी तब्येत बिघडली. मला उमेदवारी देणारे हेच जिल्ह्यातील नेते आहेत. आणि आता माघार घ्यावी म्हणून दबावही हेच टाकत आहेत. मला माझ्या पक्षाच्या नेत्यांचा माघार घ्या, म्हणून निरोपच आला नाही. त्यामुळे मी माघार घेण्याचा प्रश्नच नाही. माझ्याकडे अधिकृत एबी फॉर्म व चिन्ह असून मी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणारच आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तरी मी निवडणूक रिंगणातून माघार घेणार नाही. तसेच मला दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या सूचनाही नाहीत. त्याबाबत विनाकारण अफवा पसरवून मतदारांचा बुद्धीभेद केला जात आहे. माझी यंत्रणा काम करत आहे असेही कांबळे म्हणाले.