Bhausaheb Wakchaure | नगर : लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद ठेवून केंद्र पुरस्कृत योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यावर भर द्यावा. अधिकाऱ्यांना योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्यास केंद्र सरकारला त्याबाबत अवगत करण्यात येईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आवश्यक बदलाबाबत प्रस्ताव तयार करावा. ग्रामपंचायत आणि कृषी विभागाने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी केल्या.
हेही वाचा – राज्यातील मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर; राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण विभाग
बैठकीला यांची उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठकीत समितीचे अध्यक्ष खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि सहाअध्यक्ष निलेश लंके यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा – अपहरण करणारे आरोपी २४ तासात जेरबंद
वाकचौरे, लंकेंनी मांडली भूमिका (Bhausaheb Wakchaure)
खासदार वाकचौरे म्हणाले, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ द्यावा. स्वच्छतागृह नसलेल्या शाळांचे प्रस्ताव तयार करावे,असे ही ते म्हणाले. खासदार लंके म्हणाले, मंजूर घरकुलांसाठी लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. पीक विमा योजनेची रक्कम बँकेच्या कर्ज खात्यावर परस्पर वर्ग न करण्याच्या बँकांना सूचना देण्यात याव्यात. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेत चांगली कामे करता येतील, जल जीवन योजनेअंतर्गत कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले.