Bhima River : कर्जत : पुणे (Pune) जिल्ह्यात मान्सून पावसाच्या (Monsoon Rain) जोरदार हजेरीने धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सिद्धटेक (ता.कर्जत) येथील भीमानदीचा (Bhima River) पूल पाण्याखाली गेला. सदरचा पूल पाण्याखाली गेल्याने सिद्धटेक – दौंड संपर्क तुटला आहे.
नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
पाण्याचा विसर्ग वाढण्याची दाट शक्यता
भीमानदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने यासह पाण्याचा विसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने तालुका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी नितीन पाटील आणि तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली. आज (ता.२१) दुपारी ४ वाजता तब्बल १ लाख २८ हजार क्यूसेक वेगाने भीमानदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुणे जिल्हयात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग दौंड येथील भीमानदी पात्रात सोडल्याने कर्जत तालुक्यातील भीमानदी परिसरात पूरग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर
प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा (Bhima River)
बुधवारी (ता.२०) रात्री ११:२० वाजता सुमारे १ लाख २४ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडल्याने अष्टविनायक सिद्धटेक (ता.कर्जत) येथील अहिल्यानगर – पुणे जिल्ह्यांस जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने सिद्धटेक – दौंड संपर्क तुटला. सद्यस्थितीत भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने परिसरातील नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने नागरिक स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यासह काही शेतात देखील पाणी घुसले आहे. पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने विसर्ग वाढण्याची दाट शक्यता गृहीत धरून भीमानदी लगत असणाऱ्या बेर्डी, दुधोडी, जलालपूर, भांबोरा, खेड, गणेशवाडी, औटेवाडी, शिंपोरा, बाभूळगाव स्थानिक प्रशासनास सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी भयभीत न होता प्रशासनाच्या सुचनेचे पालन करावे, असे आवाहन कर्जत तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
सिद्धटेक येथे आपत्ती व्यवस्थापन दक्ष आणि सतर्क ठेवण्यात आले. गुरुवारी मंडळ अधिकारी रवींद्र बेल्हेकर, ग्रामसेवक श्याम भोसले, तलाठी संजीव घुले, कोतवाल सदा गावडे, भाऊसाहेब शिंदे, पोलीस पाटील दादासाहेब भोसले हे प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्यासह जिल्हा व तालुका प्रशासनाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करताना दिसत आहे. सकाळी पुराचे पाणी आणि पाण्याखाली गेलेला पूल पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.