Bhimsainik : नगर : कोपरगाव (Kopargaon) शहरात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर (Ramabai Ambedkar) यांच्या जयंती निमित्ताने शहरात ठिक ठिकाणी शुभेच्छा फ्लेक्स लावण्यात आले होते. काल (ता. ७) त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती कोपरगाव शहरात मोठ्या जल्लोषात साजरी झाली. मात्र, रात्रीतून धारणगाव रस्ता परिसरातील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे दोन शुभेच्छा फ्लेक्स फाडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे कोपरगाव शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी भीमसैनिकांनी (Bhimsainik) कोपरगाव बंद करत रस्त्यावर ठिय्या देत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र
सकल आंबेडकरी समाज संतप्त
मागील काही दिवसांपूर्वीही असाच एक शुभेच्छा फलक फडल्याची घटना ताजी असतांना आज दोन शुभेच्छा फलक फाडण्यात आल्याने सकल आंबेडकरी समाज संतप्त झाला. पोलिसांनी या आरोपीचा तपास लावून त्यास कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल
सर्व गाव १०० टक्के बंद (Bhimsainik)
आज सकाळी फ्लेक्स फडल्याची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली व कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सकल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने गोळा होऊन गाव बंदची हाक दिली. त्यानंतर सर्व गाव १०० टक्के बंद करण्यात आले तसेच बस आगरात जाऊन बसही बंद केल्या तर एक जमाव साईबाबा कॉर्नर येथे जाऊन अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर आंदोलन केले. काही वेळानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्या जमावाला शांत करत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान बॅनर फाडणाऱ्या आरोपीला पोलीसांनी शोधून अटक करावी यासाठी भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी ठिय्या दिला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहे. या घटनेने कोपरगाव शहरासह तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे.