
Bhingar Camp Police Station : नगर : अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन (Misconduct) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार स्टेनोचे काम पाहणारा पोलीस कर्मचारी दीपक सरोदे व खासगी व्यक्ती भाऊसाहेब शिंदे (रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल (Case registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगर एमआयडीसीत व्यवसायिकाची ८४ लाखांची फसवणूक
पोलीस दलात खळबळ
पोलीस अधीक्षक कार्यालयातच कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याचे शोषण, मानसिक छळ व धमक्यांना सामोरे जावे लागल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. फिर्यादी महिला पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर आहेत. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अर्जदार भाऊसाहेब शिंदे हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटीसाठी आला असताना त्याला अपर पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आले. याच कारणावरून शिंदे याने आक्रमक पवित्रा घेत अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला व तुला मी दाखवतो अशी धमकी दिली. यानंतर शिंदे याने फिर्यादीच्या विरोधात डीजी व आयजी कार्यालयात मेल व अर्जाचा सपाटा लावत मानसिक त्रास देण्यास सुरूवात केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. विशेष म्हणजे, शिंदे हा वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन फिर्यादीला उद्देशून धमकीवजा भाषा वापरत होता.
अवश्य वाचा: अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचा उमदा नेता गमावला – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
थेट संबंधाचा प्रस्ताव (Bhingar Camp Police Station)
या प्रकरणात पोलीस कर्मचारी दीपक सरोदे याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता.२३) सरोदे याने फिर्यादीला स्टेनो कार्यालयात बोलावून सगळं माझ्या हातात आहे. तुझ्याविरोधातील अर्ज मी थांबवू शकतो किंवा वाढवू शकतो, असे म्हणत थेट संबंधाचा प्रस्ताव दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच, तक्रार केल्यास माझे कोणी काही वाकडे करूशकत नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.


