Bhushan Patil:भूषण पाटीलच्या ‘कढीपत्ता’ चित्रपटात अनोखी प्रेमकहाणी;७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

0
Bhushan Patil’s film Kadhipatta:भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता' चित्रपटात अनोखी प्रेमकहाणी;७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
Bhushan Patil’s film Kadhipatta:भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता' चित्रपटात अनोखी प्रेमकहाणी;७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

Bhushan Patil : आजवर बऱ्याच प्रेमकथांनी रसिकांच्या मनावर गारूड केले आहे. आता ‘कढीपत्ता’ (Kadhipatta Movie) या आगामी मराठी चित्रपटातही प्रेक्षकांना एक अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’ अशी या चित्रपटाच्या शीर्षकाला देण्यात आलेली टॅगलाईन उत्सुकता वाढवणारी आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर (Motion Poster Release) प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नव्या दमाचा निर्माता आणि दिग्दर्शकाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला एक युथफुल लव्ह स्टोरी घेऊन आले आहेत.

नक्की वाचा :‘राव बहादूर’चे पहिले पोस्टर प्रदर्शित;सत्यदेवचा दमदार आणि आगळावेगळा लुक समोर!  

युवान प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘कढीपत्ता’ चित्रपटाची निर्मिती स्वप्नील मराठे यांनी केली आहे. कथा लेखन व दिग्दर्शन विश्वा यांनी केले आहे. निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच प्रयत्नांत दोघांनीही एक संगीतप्रधान प्रेम कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ७ नोव्हेंबरला ‘कढीपत्ता’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अवश्य वाचा : इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह

चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये नेमकं काय ? (Bhushan Patil’s film Kadhipatta)

‘कढीपत्ता’ या मोशन पोस्टरवर निसर्गरम्य वातावरणात बसलेली नायक-नायिकेची जोडी आहे. चित्रपटात भूषण पाटील मुख्य भूमिकेत आहे. मात्र नायिका पाठमोरी बसलेली आहे. पाठमोऱ्या  बसलेल्या नायिकेच्या मुखातील संवाद खूप मार्मिक आहेत. या चित्रपटात भूषणची नायिका कोण, हे रहस्य सध्या तरी गुलदस्त्यात आहे. लवकरच ‘कढीपत्ता’मधील नायिकेचा चेहरा रिव्हील केला जाणार आहे.

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक विश्वा म्हणाले की, आजच्या काळातील तरुणाई, त्यांची मते, विचार, भावना, नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि एकूणच त्यांच्या भावविश्वाची सुरेख गोष्ट या चित्रपटात आहे. प्रेमकथेला सुरेल गीत-संगीताची जोड देत ‘कढीपत्ता’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असणारा चित्रपट रसिक दरबारी सादर केला आहे. आजवर अनेक प्रेमकथा आल्या असल्या तरी यातील विषय आणि पैलू कधीही समोर आलेले नाहीत. प्रेक्षकांना एक वेगळ्या वाटेवरील चित्रपट पाहिल्याची अनुभूती ‘कढीपत्ता’ नक्कीच देईल,असेही विश्वा म्हणाले.

चित्रपटात कोणकोणते कलाकार ?(Bhushan Patil’s film Kadhipatta)

या चित्रपटात अक्षय टांकसाळे, संजय मोने, शुभांगी गोखले, गार्गी फुले, आनंदा कारेकर, गौरी सुखटणकर आदी कलाकारांच्या ही भूमिका आहेत. याखेरीज आनंद इंगळे आणि चेतना भट पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसतील. छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले असून वितरणाची जबाबदारी सिनेपोलीस सांभाळणार आहे. गीतकार मंदार चोळकर, मुकुंद भालेराव, विनू सांगवान यांनी लिहिलेली गीते संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, अनन्या वाडकर, साज भट्ट, प्रियांशी श्रीवास्तवा यांच्या आवाजात संगीतबद्ध केली आहेत.