नगर : ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Gosht) या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) हे कपल तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते. अखेर १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.
नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू
पोस्टरमध्ये नेमकं काय ? (Bin Lagnachi Gosht Movie)
‘बिन लग्नाची गोष्ट’ च्या पोस्टरमधील दृश्यामुळे खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रिया हाताची घडी घालून, मिश्कील चेहऱ्याने उभी आहे. निर्णयावर ठाम असल्याचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तर उमेश हातात हार घेऊन, डोक्याला मुंडावळ्या बांधून उभा आहे. जणू काही तो लग्नासाठी तयार आहे.मात्र परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. या सगळ्यांतून स्पष्ट होते की, ही गोष्ट पारंपरिक विवाहसंस्थेच्या बाहेर जाऊन नात्यांची नवी मांडणी करणारी आहे.
अवश्य वाचा : आलिया भट्टच्या पर्सनल असिस्टंटला अटक; बनावट सह्या करत ७७ लाखांची केली फसवणूक
चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ही गोष्ट आहे प्रेमाची, नात्यांमधल्या समज गैरसमजांची, वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेल्या गाठी सुटण्याची. हा चित्रपट म्हणजे आजच्या काळाचा एक आरसा आहे, ज्यात प्रेक्षकांना स्वतःचं प्रतिबिंब नक्की बघायला मिळेल. काहींना नव्याने प्रश्न पडतील, तर काहींना जुन्याच प्रश्नांची नवीन उत्तरं मिळतील. हलक्या फुलक्या प्रसंगातून मांडलेली ही गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की करेल.’’
१२ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार (Bin Lagnachi Gosht Movie)
गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत, ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित या ‘बिन लग्नाच्या गोष्टी’चे सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत.