BJP : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू

BJP : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू

0
BJP : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू
BJP : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू

BJP : नगर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) आचारसंहिता जाहीर होताच राजकीय पक्षांकडून (Political Party) राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडी (VBA) पाठोपाठ रविवारी (ता. २०) भाजपने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत नगर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारीनंतर महायुतीत राजकीय बंडाळ्या पहायला मिळत आहेत.

नक्की वाचा: राज्यात आज पुन्हा जोरदार पावसाच्या सरी!’या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा नागवडे करणार बंड (BJP)

या उमेदवार यादीत शिर्डी मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे, कर्जत-जामखेडमधून आमदार राम शिंदे, श्रीगोंदा मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते व राहुरी मतदारसंघातून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांनी बंड करणार असल्याचे जाहीर करत उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तर राहुरी मतदारसंघात भाजपचे नेते सत्यजित कदम यांनी बंडाचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलू लागली (BJP)

भाजपकडून पाच उमेदवार जाहीर होताच जिल्ह्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्या पाच विधानसभा मतदारसंघांसह जिल्ह्यातील महायुतीचे चित्र स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. त्यातून महायुतीत बंडाळ्या सुरू झाल्या आहेत. या उमेदवाऱ्या म्हणजे जिल्ह्यातील भाजप लढविणार असलेल्या जागा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उर्वरित जागांवरील भाजपच्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे.

श्रीगोंद्यात नागवडेंचा एल्गार
आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेतील माजी उपाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी काल (रविवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे विधान करत पाचपुतेंच्या चिंता वाढवल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचा थोड्या मतांनी विजय झाला होता. आमदार पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मागील निवडणुकीत नागवडेंनी पाचपुतेंना पाठिंबा दिल्याने पाचपुते विजयी झाल्याची चर्चा होती. अशात आता नागवडे यांनी पाचपुतेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने श्रीगोंद्यातील राजकीय वारे बदलू लागले असल्याची चर्चा आहे.

सत्यजित कदमही नाराज
भाजपने राहुरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना तिकीट जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पूत्र सत्यजित कदम नाराज झाले आहेत. त्यांनी कर्डिले यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे मनसुबे आखल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याचे सांगितले जाते. या मेळाव्यातून राहुरी मतदारसंघातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

मुरकुटेंची खदखद
भाजपने नेवासे मतदारसंघात उमेदवार जाहीर न केल्याने ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची चिंता वाढली आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत निवडणूक लढवण्याचा विचार केल्याची सांगितले जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

काळे-कोल्हे वादावर तोडगा
कोपरगावमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांच्यात नाराजी होती. काळे व कोल्हे कुटुंबात तीन पिढ्यांपासून राजकीय सत्तासंघर्ष आहे. त्यामुळे कोल्हेंना भाजप सोडावी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र, यावर उपाय शोधण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे यंदा कधी नव्हे ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हे असा सामना होणार नसल्याची चर्चा आहे. कोल्हे कुटुंबाला फडणवीस यांनी काय शब्द दिला यावर कोपरगावचे पुढील राजकारण ठरणार आहे.

शेवगावमध्ये भाजपमध्ये नाराजी
शेवगावमधील भाजपचे नेते अरुण मुंढे व पाथर्डी मधील गोकूळ दौंड यांनी भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात पक्षाकडे नाराजी व्यक्त केली होती. राजळे या आमदार पंकजा मुंडे यांच्या समर्थक आहेत. राजळे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे. या नाराजीवर पंकजा मुंडे व मोनिका राजळे असा मार्ग काढणार यावर या मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून आहेत.