BJP : श्रीरामपूर : मुंबई येथील भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते व कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत श्रीरापुरातील काँग्रेसच्या (Congress) (ससाणे गट) माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह १० प्रमुख स्थानिक नेत्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात पक्षप्रवेश करत अखेर कमळ हाती घेतले आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी! संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला
आमदार ओगले व माजी नगराध्यक्ष ससाणे यांना जोरदार धक्का
दरम्यान या पक्ष प्रवेशाने आमदार हेमंत ओगले व माजी नगराध्यक्ष करण ससाणे यांना जोरदार धक्का बसला आहे. त्यामध्ये माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक अशिष धनवटे, माजी नगरसेवक भारती कांबळे, दत्तात्रय सानप, शामलिंग शिंदे, आशिष धनवटे, राजू आदिक, कैलास दुबय्या, शशांक रासकर, मनोज लबडे, सोमनाथ गांगड, माजी सभापती संजय गांगड, दिगंबर फरगडे, माजी उपसभापती सुनील क्षीरसागर, सरपंच विराज भोसले, माजी सरपंच अॅड. युवराज फंड, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष वैभव लोढा, सचिव दत्तात्रय ढालपे, उपाध्यक्ष निलेश बोरावके, उद्योजक पराग शहा, राकेश न्याती, संदीप अग्रवाल, चेतन भुतडा, योगेश डंबीर, चिरायू नगरकर, सिद्धार्थ फंड, अमोल शेटे यांच्यासह १०० ते १२५ जणांनी आज मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात पक्षात प्रवेश केला.
अवश्य वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!
श्रीरामपूरचे राजकीय समीकरण बदलणार (BJP)
काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांसह व्यापारी, उद्योजकांनी श्रीरामपूरच्या विकासासाठी भाजपवर विश्वास ठेवला. यापुढील काळात श्रीरामपूरचा विकास अजून जोमाने करू, असे आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी दिले. दरम्यान, या प्रवेशामुळे श्रीरामपूरचे राजकीय समीकरण बदलणार असून आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये याचे परिणाम दिसणार आहेत. ज्या नेत्यांच्या विरोधात येथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी संघर्ष करत पक्ष जिवंत ठेवला. त्यातीलच प्रमुख चेहरे आता भाजपमध्ये आल्याने भाजपचे मूळ कार्यकर्ते काय भूमिका घेणार ? याकडे सर्व श्रीरामपूरचे लक्ष लागले आहे.
”आजच्या पक्ष प्रवेशाने फारसा फरक पडत नाही. हे गेल्यामुळे संधीअभावी थांबून असलेल्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल. पक्षाची नव्याने बांधणी करू. आगामी पालिका निवडणूकही जिंकू. आपण सत्तेपुढे वाकणारे नाहीत. जे गेले ते मनाने गेलेले दिसत नाही. त्यांच्या काही अडचणी असतील, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल”.
आमदार हेमंत ओगले