BJP : नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान (Prime Minister) पदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जे पी नड्डा (JP Nadda) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एका व्यक्तीकडे एकच पद या नियमामुळे मंत्री झालेले नड्डा आता भाजपचे अध्यक्ष पद सोडणार आहेत. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अवश्य वाचा : माेदींच्या तिसऱ्या टर्मची वाटचाल गाैरवशाली ठरणार; महसूलमंत्र्यांचा विश्वास
चर्चेत असलेल्या चौघांचा मंत्रिमंडळात समावेश (BJP)
भाजपमध्ये आधी पक्षाध्यक्ष आणि मग केंद्रात मंत्री असा पॅटर्न सत्ताधारी पक्षात सलग तीनवेळा दिसला आहे. २०१४ मध्ये राजनाथ सिंह, २०१९ मध्ये अमित शहा, यांच्यानंतर आता २०२४ मध्ये जे. पी. नड्डा केंद्रात मंत्री झाले आहेत. जानेवारी २०२० मध्ये नड्डा यांच्याकडे पक्षाकडे धुरा आली. त्यांचा कार्यकाळ यंदाच्या जानेवारीत संपला. पण लोकसभा निवडणूक असल्यानं त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ याच महिन्यात संपत आहे. नड्डा यांच्यानंतर अध्यक्षपदासाठी चार नावांची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांच्यापैकी एकाला अध्यक्षपद मिळेल अशी शक्यता होती. पण या चौघांची निवड मंत्रिमंडळात झाल्यानं भाजपची धुरा कोणाकडे जाणार, हा प्रश्न कायम राहिला आहे.
नक्की वाचा : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय
विनोद तावडे आणि सुनील बन्सल यांची नावं आघाडीवर (BJP)
भाजपचे महासचिव असलेले विनोद तावडे आणि सुनील बन्सल यांची नावं अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे. राज्य मंत्रिमंडळानंतर काम केल्यानंतर २०१९ मध्ये भाजपनं त्यांना विधानसभेत संधी दिली नाही. पण तावडेंनी कोणतीच खळखळ केली नाही. यानंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणात पक्षानं संधी दिली. तावडेंनी संधीचं सोनं केलं. सध्याच्या घडीला विनोद तावडेंकडे बिहारचा प्रभार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. तावडेंनी अल्पावधीतच राष्ट्रीय राजकारणात छाप पाडली आहे. यासह सुनील बन्सल यांनीही उललेखनीय कामगिरी केलेली आहे, त्यामुळे अध्यक्षपद कोणाकडे जाईल हे पाहणी औत्सुक्याचे ठरणार आहे.