BLO Mapping : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांना एकाच वेळी दहावीच्या एसएससी परीक्षेचे कामकाज आणि बीएलओ मॅपिंगची (BLO Mapping) जबाबदारी देण्यात आल्याने शिक्षकांपुढे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी (District Collector) तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांची भेट घेऊन परीक्षा कामकाज पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शिक्षकांची सेवा बीएलओ कामकाजासाठी उपलब्ध करून घेण्याबाबत सुधारित आदेश देण्याची मागणी केली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत स्थायी समितीकडून तब्बल १७१० कोटीचे अंदाजपत्रक मंजूर

कामाचा मोठा ताण
जिल्ह्यात १८ फेब्रुवारीपासून माध्यमिक विद्यालयांमधून दहावीची एसएससी परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार आहेत. या काळात अनेक माध्यमिक विद्यालयांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा सहायक, परीक्षक, पर्यवेक्षक, लिपिक, पेपर तपासनीस, मॉडरेटर अशा विविध जबाबदाऱ्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांवर आधीच मोठा कामाचा ताण आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कार्यमुक्त करण्याचे आदेश (BLO Mapping)
अशा परिस्थितीत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अनेक शाळांना पत्र पाठवून काही शिक्षक व कर्मचाऱ्यांना बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) मॅपिंग कामकाजासाठी १२ ते २२ मार्च या कालावधीत पूर्ण वेळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे संबंधित शिक्षकांना परीक्षा कर्तव्य आणि बीएलओ कामकाज अशा दोन जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडाव्या लागत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तसेच उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांची भेट घेतली.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव संभाजी पवार, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, भाजप शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष वैभव सांगळे, शिक्षक नेते अशोक आव्हाड, अविनाश विधाते, पांडुरंग जावळे, कांतिलाल खुरांगे आदी उपस्थित होते.



