Book festival : नगर : नगर ग्रंथोत्सव २०२३चे आयोजन २ व ३ मार्च रोजी सावेडी उपनगरातील सामाजिक न्याय भवन येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) सभागृह येथे करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे (Book festival) उदघाटन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते शनिवारी (ता. २) सकाळी ११ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी ग्रंथालय संचालक तथा नगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी दिली.
हे देखील वाचा: गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा; सनद निलंबन निर्णयाला स्थगिती
अनेक मान्यवरांची उपस्थिती (Book festival)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार किशोर दराडे, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार बाळासाहेब थोरात,आमदार बबनराव पाचपुते, आमदार शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार लहू कानडे, आमदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नक्की वाचा: निवडणूक प्रक्रियेत कधी भाग घेतला नाही; भविष्यातही घेणार नाही: भास्करगिरी महाराज
ग्रंथदिंडीचे आयोजन (Book festival)
या ग्रंथोत्सवानिमित्त शनिवारी (ता. २) सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीचे आयोजनही करण्यात आले आहे. या ग्रंथदिंडीचा प्रारंभ समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, राधाकिसन देवढे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, अशोक कडूस, हिंद सेवा मंडळ व अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांच्या प्रमुख उपस्थितीत रेणाविकर माध्यमिक विदयालय येथे होणार आहे. ही ग्रंथ दिंडी सावेडी नाका मार्गे जाणार असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन येथे समारोप होणार आहे.
उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचा एकपात्री प्रयोग कवी व सिनेअभिनेते फुलचंद नागटिळक हे सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य, जयंत येलूलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक, वक्ता व लेखक व एन. बी. धुमाळ हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवचरित्रावर बीड येथील गणेश भोसले यांचे व्याख्यान होणार आहे.
रविवारी (ता. ३) सकाळी १० वाजता निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे व प्रमुख पाहुणे म्हणून शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, ज्येष्ठ कवी प्रा. शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी (निवृत्त) बाबासाहेब खराडे यांचा कविता आणि विनोदावर आधारीत एकपात्री कार्यक्रम 'हसण्यासाठी जन्म आपुला' होणार आहे. दुपारी ३.३० वाजता समारोपाचा कार्यक्रम होणार असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी भुसंपादन हिरामण झिरवाळ हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी, दीपक दातीर, जिल्हा कोषागार अधिकारी, श्रीमती भाग्यश्री जाधव-भोसले, जिल्हा माहिती अधिकारी, डॉ. रविंद्र ठाकुर, जिल्हा परिषद सहा.शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अहमदनगर ग्रंथोत्सव २०२३च्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील साहित्यिक, ग्रंथप्रेमी, ग्रंथविक्रेते, रसिक वाचक, नागरिक यांना ग्रंथ हाताळण्याची, वाचनाची व खरेदी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. यामध्ये शासकीय प्रकाशन, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ तसेच विविध प्रकाशक, विक्रेते यांचे दर्जेदार ग्रंथ सवलतीच्या दरात वाचकांना खरेदी करण्याची संधी वाचकांना उपलब्ध होणार आहे. विविध एकपात्रीप्रयोग व कविसंमेलनातून दोन दिवस मनोरंजन व ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी शाळा महाविद्यालयाती विद्यार्थी, शिक्षक , प्राध्यापक , साहित्यिक सहभागी होणार आहे व सर्व रसिक नागरिकांनी या सुवर्ण संधीचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले आहे.