
Book Festival : नगर : ‘सकाळ’च्या (Sakal) पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची महोत्सवाची (Book Festival) मेजवानी शुक्रवारपासून मिळणार आहे. सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नामवंत लेखक (Famous Authors) वाचकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधता येईल. जोडीला सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.
नक्की वाचा : दरोड्याच्या तयारीत असलेले १० आरोपी गजाआड
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महोत्सवा’चे उद्घाटन
शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ‘सकाळ पुस्तक महोत्सवा’चे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता डॉ. सदानंद मोरे यांचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक वारसा या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यांच्या हस्ते प्रा. मोहंमद आझम, बंगाली साहित्याचे अनुवादक विलास गिते यांचा गौरव केला जाणार आहे. आझम यांनी सुफी साहित्यात मोठे काम केले आहे. उभयतांना साहित्यातील योगदानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. सायंकाळी इंडियन आयडॉल फेम अंजली व नंदिनी गायकवाड यांचा स्वरयात्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
अवश्य वाचा १० कोटीसाठी अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याचा खून
सोबत गीतांचीही पर्वणी (Book Festival)
शनिवारी (ता.२२) साडेदहा वाजता ‘गोष्ट इथे संपत नाही,’ हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. सारंग भोईरकर व सारंग मांडके तो सादर करतील. त्यानंतर प्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचा साहित्यातील गमतीजमतीवर आधारित साहित्यानंद कार्यक्रमाची मेजवानी आहे. सायंकाळी प्रसिद्ध व्याख्याते, गीतकार गणेश शिंदे व महागायिका सन्मिता शिंदे यांचा ‘गोष्टीचे पुस्तक आणि पुस्तकातील गोष्ट’ हा अनोखा कार्यक्रम पाहायला मिळेल. सोबत गीतांचीही पर्वणी असेल.
रविवारीही (ता.२३) भरगच्च कार्यक्रम आहेत. मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची साहित्यिक प्रसाद मिरासदार मुलाखत घेणार आहेत. त्यानंतर साडेबारा वाजता ‘सकाळ’ प्रकाशनाचे लेखक रवींद्र कांबळे, सुमित डेंगळे, प्रकाश जाधव, सुधाकर रोहोकले, डॉ. अर्जुन शिरसाठ यांच्याशी अमृता देसर्डा संवाद साधतील. त्यानंतर तीन वाजता आदित्य निघोट व भूषण पटवर्धन यांचे संवादसत्र आहे. सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन माजी आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्रसिद्ध कवी, निवेदक अरुण म्हात्रे, शशिकांत शिंदे, डॉ. संजय बोरुडे, अमोल बागूल आदी सहभागी होतील.
सोमवारी (ता.२४) महोत्सवाचा समारोप आहे. सकाळी अकरा वाजता सहायक ग्रंथालय संचालक सचिन झोपुले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले हे ग्रंथालय चळवळीविषयी मार्गदर्शन करतील. दुपारी एक वाजता प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांच्यासोबत वाचकांना संवाद साधता येईल. दुपारच्या सत्रात तीन वाजता ‘भविष्यातील आव्हानांसाठी तरुणाईची तयारी आणि पुस्तकांचे महत्त्व’ या विषयावर माजी सनदी अधिकारी, चाणक्य मंडळचे अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी समारोपाचे सत्र आहे. प्रसिद्ध साहित्यिक, इतिहास अभ्यासक विश्वास पाटील यांचे ‘संभाजी एक तेजस्वी योद्धा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.