Bribery : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील वाळुंज ग्रामपंचायत हद्दीत ठेकेदाराने केलेल्या कामाच्या बदल्यात पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी सरपंचाच्या मुलाने २५ हजारांची लाच (Bribery) मागितली. ही लाच स्वीकारताना सरपंचाच्या (Sarpanch) मुलास लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Bureau) पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नवी माहिती
एक लाख रुपयांची मागणी
मकरंद गोरखनाथ हिंगे (वय- ४० रा.वाळुंज, जि. अहिल्यानगर), असे लाच घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांनी बांधकाम विभागामार्फत वाळूंज ग्रामपंचायत येथे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कंत्राट घेतले होते. या कामासाठी १० लाखांचे बिल मंजूर झाले होते. त्यासाठी तक्रारदार यांना कामाचा पूर्णत्वाचा दाखल वाळूंज ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून पाहिजे होता. तो दाखला देण्याच्या मोबदल्यात सरपंच यांचा मुलगा मकरंद हिंगे यांनी सरपंचांची सही घेऊन देण्याकरीता सरपंच यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांनी लाच देण्यास नकार देत अहिल्यानगर लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली.
अवश्य वाचा : “मराठी गया तेल लगाने”, असे म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चांगलीच घडवली अद्दल
पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये स्विकारण्याची दर्शवली तयारी (Bribery)
त्यानुसार लाचलुचपत विभागाने लाच पडताळणी केली. या दरम्यान आरोपी मकरंद गोरखनाथ हिंगे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती ४५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोड, अहिंसा चौक येथे सापळा रचून आरोपीस २५ हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस नाईक उमेश मोरे, महिला पोलीस हवालदार राधा खेमनर, सचिन सुद्रिक, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.