Swapnil Kusale:स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक,कसा आहे त्याचा प्रवास?

महाराष्ट्रातील २८ वर्षीय कोल्हापुरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने भारताला ऑलम्पिकमधील तिसरं कास्यंपदक मिळवून देत, देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

0
Swapnil Kusale:स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक,कसा आहे त्याचा प्रवास ?
Swapnil Kusale:स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक,कसा आहे त्याचा प्रवास ?

swapnil kusale : महाराष्ट्रातील २८ वर्षीय कोल्हापुरचा (Kolhapur) नेमबाज स्वप्नील कुसाळेने भारताला ऑलम्पिकमधील (Olympic) तिसरं कास्यंपदक (Bronze Medal) मिळवून देत, देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक पदार्पणातच स्वप्निलने अवघड मानल्या जाणाऱ्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केलीय. नेमबाजीच्या या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला.

विशेष बाब म्हणजे स्वप्नीलने महाराष्ट्राचा ७२ वर्षांचा ऑलम्पिकमधील पदकाचा दुष्काळ संपवलाय. १९५२ मध्ये हेलसिंकी मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर महाराष्ट्राला २०२४ च्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये हा पदकवीर गवसला आहे.

नक्की वाचा : अभिमानास्पद! मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक 

कोण आहे स्वप्नील कुसाळे? (Swapnil Kusale)

नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुराच्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक असून त्याची आई कांबळवाडी गावची सरपंच आहे. ६ ऑगस्ट १९९५ मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिक मध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने १२ वीचा पेपरकडे कानाडोळा केला होता. २००९ मध्ये स्वप्निलच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले आणि तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

सुरुवातीच्या काळात नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी स्वप्नीलने पुणे आणि नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. या नेमबाजाची जीवनकहाणी भारतीय क्रिकेटपटू एम एस धोनी सारखीच आहे. धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करत आहे. तो धोनीला आपला आयडॉल मानतो आणि धोनीप्रमाणे तो मैदानात शांत पद्धतीने वावरताना दिसतो.

अवश्य वाचा : हिमाचल प्रदेशातील शिमला,मंडी मध्ये ढगफुटी ;३० जणांचा मृत्यू


स्वप्नीलने २०१२ मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय शूटिंग करिअरला सुरुवात केली. नववीत असताना त्याच्या वडिलांनी त्याला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले होते. यावेळी त्याने रायफल उचलली आणि तेव्हापासून त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. २०१२ मध्ये त्याची जर्मनीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी स्वप्नीलची पहिल्यांदा निवड झाली तेव्हा स्वप्निलच्या वडिलांनी दीड लाखाचं कर्ज घेऊन त्याला पाठवलं होत. मुलाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्याचे पाहताच स्वप्निलच्या आई वडील आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी  भारताचा तिरंगा तो कधीही खाली पडू देणार नाही याची मला खात्री होती, अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली.

स्वप्नील कुसाळेची कारकीर्द  (Swapnil Kusale)

२०२२ मध्ये स्वप्नीलने २२ ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील कैरो इथं झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. २०२३ मध्ये चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा, २०२२ मध्ये बाकू येथील विश्वचषक आणि २०२१ मध्ये नवी दिल्ली इथं नेमबाजीत स्वप्नील हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. याशिवाय त्याने २०१५ ते २०२३ या कालावधीत विविध नेमबाजी स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली आहेत. अखेर त्याच ऑलम्पिकमधील पदकाचे स्वप्नही पूर्ण झालं आहे. स्वप्नीलने पदक जिंकताच त्याच अभिंनदन करण्यासाठी त्याच्या गावातील शाळकरी मुलांनी फेरी काढत त्याच कौतुक केले आहे. महाराष्ट्रासाठी स्वप्नीलने दिलेले योगदान हे अभिमानास्पद असल्याने त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here