Burglary : नगर : शेवगाव व पाथर्डी परिसरात घरफोडी (Burglary) करणाऱ्या सराईत आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केली. लखन विजय काळे (वय २२, रा. शेवगाव, ता. शेवगाव), गोरख हैनात भोसले (वय २४, रा. घोसपुरी, ता. नगर) व सोनाजी एकनाथ गर्जे (वय ५२, रा. गर्जेवस्ती, शेवगाव, ता. शेवगाव) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. या सराईत आरोपींकडून पथकाने ९४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) हस्तगत केले.
नक्की वाचा: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे कर्जतमध्ये उत्साहात स्वागत
एक लाख ९२ हजारांची केली होती चोरी
शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील महादेव मुंढे यांच्या घरी गुरुवारी (ता. ४) सकाळी घरफोडीची घटना घडली होती. यात चोरांनी मुंढे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या संदर्भात मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
अवश्य वाचा: फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास (Burglary)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या घटनेचा तपास करण्यासाठी पथक तयार केले. या पथकाने परिसरातील सराईत आरोपींची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, पिंगेवाडी येथील घरफोडी लखन काळे व त्यांच्या साथीदारांनी केली आहे. हे आरोपी चोरीचे सोने विकण्यासाठी शेवगाव येथील गेवराई रस्त्यावर असलेल्या सरकारी दवाखान्याजवळ येणार आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले. काळे व भोसले या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे, शिरसाठवाडी व जोगेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील चांदगाव, पिंगेवाडी व शेवगाव शहरात घरफोडी व चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. या गुन्ह्यांतील दागिने विकण्यासाठी सोनाजी गर्जे याला दिल्याचे त्यांनी सांगितले. पथकाला गर्जे याच्या अंगझडतीत सहा लाख ६३ हजार ५०० रुपये किमतीचे ९४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले. पथकाने जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जेरबंद आरोपींपैकी लखन काळे हा सराईत आरोपी असून त्यांच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत.