Chain Snatching : नगर तालुका : राहाता तालुक्यातील चितळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने सराईत गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने पकडले. या आरोपींकडून चार चेन स्नॅचिंगचे (Chain Snatching) गुन्हे उघड झाले. त्यानुसार आरोपींकडून पाच लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गणेश भानुदास कुऱ्हाडे (वय ३५), राहुल अनिल कुऱ्हाडे (वय १९) व सचिन मधुकर कुऱ्हाडे (वय ३२, तिघे रा. चितळी स्टेशन, ता. राहाता) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.
नक्की वाचा : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार
तांत्रिक पद्धतीने तपास (Chain Snatching)
सुवर्णा मिसाळ या रस्त्याने पायी घरी जाताना पाठीमागुन काळ्या रंगाच्या दुचाकी चोर आले. त्यांनी सुवर्णा मिसाळ यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे २६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून नेले. या संदर्भात त्यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविला होता. त्यानुसार पथकाने कोपरगाव, शिर्डी, राहाता व लोणी परिसरातील चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्यामधील आरोपींचे वर्णन व गुन्हा करताना वापरलेली दुचाकी याच्या आधारे तपास करुन दुचाकीवरील गणेश कुऱ्हाडे याला ताब्यात घेतले.
हे देखील वाचा : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; ‘शिवप्रतिष्ठान’च्या धारकऱ्यांचा सवाल
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करत असल्याची कबुली (Chain Snatching)
त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने राहुल कुऱ्हाडे व सचिन कुऱ्हाडे या साथीदारांची नावे सांगितले. ही टोळी लोणी, राहाता व शिर्डी परिसरातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करत असल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानुसार पथकाने त्याच्या साथीदारांनाही ताब्यात घेतले. पथकाने जेरबंद आरोपींकडून एक लाख ५६ हजार रुपये किमतीचे २६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, दीड लाख रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, ६० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, एक लाख २० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे गंठण व ७५ हजार रुपयांची दुचाकी असा एकूण पाच लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपींना लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.