नगर : चहा आणि चहावाला (Chaiwala) हे भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर कोणी टी. सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मात्र ही ‘चाय’ आहे.ही चाय बनवणारा चायवाला सर्वांना रोज ताजेतवाने ठेवण्याचं काम करत असतो. हाच चायवाला आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. ‘चायवाला’ हा मराठी चित्रपट (Marathi Movie) लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा मोशन पोस्टर रिलीज करून करण्यात आली आहे.
नक्की वाचा : यशस्वीची ‘यशस्वी’ खेळी; शतक ठोकत मुंबईला नमवलं
‘चायवाला’ च्या रूपात एक विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Chaiwala Movie)
‘चायवाला’च्या रूपात एक धम्माल विनोदी मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा सिनेमा सामाजिक संदेशही देण्याचं काम करणार आहे. हॅाट चॅाकलेट प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे सहनिर्मिते तानाजी वगरे आणि गोविंद वाघमारे आहेत. अजय-उद्भव या जोडगोळीकडे ‘चायवाला’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘करोड़ों चाहने वालों का मेला है, कौन कहता चायवाला अकेला है’ हे चित्रपटाच्या पोस्टरवरील वाक्य बरंच काही सांगणारं आहे.
चायवाल्याचा पोस्टर रिलीज (Chaiwala Movie)
सोशल मीडियामुळे आज चायवाल्यांपासून वडापाववाल्यांपर्यंत सर्वच जण फेमस झाले आहेत. यात दिल्लीतील डॅाली चायवाल्याची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘चायवाला’ चित्रपटातील नायक नेमका कसा असणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. ‘सम ड्रीम्स नेव्हर स्लीप’ ही टॅगलाईनही खूप मार्मिक आहे. या चित्रपटाद्वारे प्रथमच एक अनाथ मुलगा आणि मुलगी रुपेरी पडद्यावर नायक-नायिकेच्या रूपात दिसणार आहेत. डोक्यावर पांढरी टोपी, बनियान आणि पाठीमागे चुलबुल पांडे स्टाईलमध्ये अडकवलेला गॅागल असा चायवाल्याचा पाठमोरा लुक पोस्टर मध्ये रिलीज करण्यात आला आहे. हा चायवाला नेमकी काय धम्माल करतो हे चित्रपटात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अवश्य वाचा : लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक; १० जणांचा मृत्यू
‘चायवाला’मध्ये अजय सूर्यवंशी, राजयोगिनी, पार्थ भालेराव, कमलेश सावंत आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची पटकथा तसेच संवादलेखन विनय येरापले यांनी केलं आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. गीतकार विनय येरापले यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी संगीत दिलं आहे. विजय पाटील रंगभूषा करणार असून, संतोष यादव कार्यकारी निर्माते आहेत.