Child Helpline 1098 : नगर : शहरातील रस्त्यांवर, सिग्नलवर किंवा धार्मिक स्थळांभोवती दिसणारे बाल भिक्षेकरी (Child Beggars) कुणालाही अस्वस्थ करतात. ही समस्या देशभरात एक गंभीर सामाजिक विषय बनली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा मुलांना भीक देणे थांबवावे, अशी बालके आढळल्यास त्यांची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ (Child Helpline 1098) या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम (Sanjay Kadam) यांनी केले आहे.
नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल
बालक भीक मागताना दिसल्यास १०९८ वर कॉल करा
बाल भिक्षेकरी ही सार्वजनिक शिस्तीचा भंग आणि बालहक्कांचे उल्लंघन करणारी एक गंभीर समस्या आहे. बालवयात शिक्षण व व्यक्तिमत्त्व घडण्याच्या काळात अनेक मुले कुटुंबातील गरिबी, दुर्लक्ष किंवा काही वेळा जबरदस्तीमुळे रस्त्यावर येतात आणि भीक मागतात. ही परिस्थिती केवळ त्यांचे बालपण हिरावून घेत नाही, तर त्यांना दैनंदिन हिंसा, शोषण व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विळख्यात ढकलते. रस्त्यावर कोणतेही बालक भीक मागताना दिसल्यास त्याला पैसे देण्याऐवजी १०९८ वर कॉल करा. सामाजिक संस्थांशी संपर्क साधून त्या मुलाला योग्य मदतीकडे वळवा. आपल्या परिसरात बालभिक्षावृत्ती रोखण्यासाठी व बालकांना बाल आश्रमात दाखल करण्यासाठी स्थानिक यंत्रणांना सतर्क करा. जेव्हा ही बालके हात पसरतात, तेव्हा नागरिक सहानुभूतीपोटी त्यांना पैसे, अन्न किंवा वस्त्र देतात. मात्र, यामुळे त्यांना तात्पुरती मदत मिळते, पण त्यांची खरी परिस्थिती सुधारत नाही. पर्यायाने शिक्षण, कौशल्य विकास यापासून ते दूर राहतात.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
‘भीक देणे थांबवा, शिक्षण द्या’ मोहिमा सुरू (Child Helpline 1098)
जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलीस प्रशासन या समस्येवर जनजागृती अभियान राबवत आहे. ‘भीक देणे थांबवा, शिक्षण द्या’ असा संदेश देणारे फलक, पोस्टर्स, शाळांमध्ये विशेष सत्रे आणि स्थानिक माध्यमांतून मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते, प्रत्येक नागरिकाने सजग राहणे आवश्यक आहे. जर कुठे बालकांना भीक मागताना पाहिले, तर १०९८ या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी. अशा मुलांना संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करणे हे आपल्या घटनात्मक व सामाजिक कर्तव्याचा एक भाग आहे. या मुलांना बालगृहात प्रवेश देणे, शिक्षणाची सोय, कौशल्य प्रशिक्षण व त्यांच्या पालक अथवा संरक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन करणे, असे उपाय प्रशासनाने हाती घेतले आहेत. हे प्रयत्न प्रभावी ठरण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.