Child Marriage : पारनेर : बालविवाहासारख्या (Child Marriage) सामाजिक संकटाला संपवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ (Child Marriage Free) अभियानाला तालुका स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या व्यापक उपक्रमाचे महत्त्वाचे पाऊल म्हणून पारनेर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या अभियानामध्ये स्नेहालय (Snehalaya) संस्था संचलित ‘उडान प्रकल्प’, महिला व बालविकास विभाग (Women and Child Development Department), जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाइन तसेच जिल्हा व तालुका प्रशासन यांचा संयुक्त सहभाग आहे.
नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर
भारतात अजूनही बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक
गेल्या पाच वर्षांपासून स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या पुढाकारातून उडान प्रकल्पाने जिल्ह्यात बालविवाह विरोधी चळवळ रुजवली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विविध भागात ग्रामपातळीवरील प्रशिक्षण, जनजागृती, कायदेशीर साक्षरता, आणि बाल संरक्षण यंत्रणांचे सक्षमीकरण हे काम सातत्याने सुरू आहे. भारतात अजूनही बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असून, त्याचे शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम गंभीर आहेत. शिक्षण हाच या समस्येवर उपाय असल्याचे स्पष्ट करत उडान प्रकल्प ‘शाळा आणि समाज’ या दोन्ही पातळ्यांवर काम करत आहे.
अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!
कायदेशीर बाजूंवर सखोल मार्गदर्शन (Child Marriage)
पारनेर तालुक्यात पार पडलेल्या या कार्यशाळेत ज्येष्ठ अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी बालविवाहाचे केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक व राष्ट्रीय पातळीवर होणारे दुष्परिणाम विशद केले. “बालविवाह थांबवण्याची किल्ली ही मंडपात नाही, ती शाळेच्या वर्गात आहे,” असे सांगत त्यांनी शिक्षण, जनजागृती आणि समाजाची सामूहिक जबाबदारी यावर भर दिला. प्रवीण कदम (उडान प्रकल्प व्यवस्थापक) यांनी कायदेशीर बाजूंवर सखोल मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी सर्जेराव शिरसाठ यांनी ग्रामस्तरावरील बाल संरक्षण समित्यांची भूमिका, त्यांची जबाबदारी आणि कामकाजाविषयी माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाइनचे जिल्हा समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी हेल्पलाइनची कार्यप्रणाली, त्वरित प्रतिसाद व संरक्षक कारवाई याबाबत अनुभवसिद्ध माहिती दिली.
कार्यशाळेला पारनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. दया पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे, गट शिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी (पारनेर) जयश्री उदावंत, बालविकास प्रकल्प अधिकारी (भाळवणी) कमल राऊत, पत्रकार भगवान गायकवाड तसेच सर्व ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेविका, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, महिला प्रतिनिधी, सरपंच आणि पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले.
या कार्यशाळेत सर्व सहभागी मान्यवरांनी दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामसभांमध्ये “माझे गाव – बालविवाहमुक्त गाव” हा ठराव संमत करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. ही कार्यशाळा केवळ माहितीपर न राहता प्रत्येक घटकाच्या मनामनात सामाजिक परिवर्तनाचा बीज रोवणारी ठरली. उडान प्रकल्पाच्या माध्यमातून बालविवाहमुक्त जिल्ह्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल, संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणास्थान ठरणार आहे.