Child Marriage : पारनेर : देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात आणि अभिमानाने साजरा होत असताना अहिल्यानगर शहरातही राष्ट्रभक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले. शहरातील पोलीस परेड मैदानावर जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते तिरंग्याचे अत्यंत दिमाखात ध्वजवंदन करण्यात आले. ध्वज वंदना नंतर राष्ट्रगीताच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला.
नक्की वाचा: मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट बँडची शहिदांना संगीतमय आदरांजली
‘बालविवाह मुक्त भारत’ करण्याची सामूहिक प्रतिज्ञा
या सोहळ्यादरम्यान उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांना ‘बालविवाह मुक्त भारत’ करण्याची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विविध प्रकारचे पोलीस संचालन, संचलनात सहभागी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तसेच विविध विभागांचे चित्ररथ सादर करण्यात आले. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आणि जनतेमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरलेला चित्ररथ म्हणजे स्नेहालय संस्थेचा उडान जनजागृती चित्ररथ होय.
अवश्य वाचा: हा सण ऊर्जा आणि प्रेरणा… पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
स्नेहालय ‘उडान’ प्रकल्पाच्या माध्यमातून भक्कम पाठबळ (Child Marriage)
महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या बालविवाह मुक्त भारत अभियानाला स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या माध्यमातून भक्कम आणि निर्णायक पाठबळ देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, तसेच महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या नेतृत्वात हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आले.
या अभियानामध्ये सर्वात मोठे, सातत्यपूर्ण आणि मैदानी पातळीवरील योगदान स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाचे राहिले आहे. मागील सहा वर्षांपासून दिवस-रात्र, चोवीस तास आणि सातही दिवस बालविवाह प्रतिबंध व बालकांच्या हक्कांसाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या उडान प्रकल्पाच्या कामाची आज देशपातळीवर पावती मिळत आहे. जिल्ह्यात बालविवाहाबाबत फारशी चर्चा नसताना, या विषयावर कोणी पुढे येत नसताना, त्या काळापासून उडान प्रकल्पाने ही अमानवी प्रथा मुळापासून नष्ट करण्यासाठी संघर्ष सुरू केला होता.
उडान प्रकल्पाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-वस्त्या, गावोगावी, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून अवघ्या 45 दिवसांत 2 लाखांहून अधिक नागरिकांनी बालविवाह विरोधी शपथ व प्रमाणपत्रे घेतली असून, 22 हजारांपेक्षा अधिक विविध जनजागृती उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आले.
या सर्व सामूहिक प्रयत्नांमुळे बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याने संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला असून, यामुळे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर व्यापक स्वरूपात पोहोचले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा सन्मान अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे.
या संपूर्ण अभियानाला स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, स्नेहालय संस्थेचे संचालक हनिफ शेख तसेच उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड बागेश्री जरंडीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दूरदृष्टीतून व सातत्यपूर्ण प्रेरणेतून उडान प्रकल्पाने बालविवाह विरोधी लढ्याला बळ दिले. यावेळी युवा निर्माण प्रकल्पातील सर्व शिबिरार्थी तसेच अहिल्यानगर शहरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत स्नेहालय उडान जनजागृती चित्ररथात सक्रिय सहभाग नोंदवला.
या व्यापक उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, चाइल्ड हेल्पलाईन १०९८, सखी वन स्टॉप सेंटर तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांचे मोलाचे व समन्वयात्मक सहकार्य लाभले. या सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बालविवाह मुक्त भारत अभियान अधिक प्रभावी ठरले असून, समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत हा संदेश पोहोचविणे शक्य झाले आहे.



