Collector : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात सन २०२६ मधील सण व उत्सवांच्या काळात एकूण १५ दिवस सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास जिल्हाधिकारी (Collector) तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Asia) यांनी परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे आदेश व सुधारित ध्वनी प्रदूषण (Noise Pollution) (नियमन व नियंत्रण) नियम २०१७ नुसार ही सूट जाहीर करण्यात आली असून, श्रोतृगृहे, सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी ही सवलत लागू राहील.
नक्की वाचा : बेलापूर-परळीसाठी मंत्री विखे करणार रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; आमदार लंघेंची मध्यस्थी
या दिवशी ध्वनिक्षेपकासाठी सूट
जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या या १५ दिवसांमध्ये १९ फेब्रुवारी रोजीची शासकीय शिवजयंती, १४ एप्रिल रोजीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे रोजीचा महाराष्ट्र दिन व २६ ऑगस्ट रोजीच्या ईद-ए-मिलादचा समावेश आहे. याशिवाय गणपती उत्सवात १५ सप्टेंबर रोजीचा दुसरा दिवस, १८ सप्टेंबर रोजीचे गौरी पूजन, १९ सप्टेंबर रोजीचे गौरी विसर्जन व २५ सप्टेंबर रोजीची अनंत चतुर्दशी असे चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येतील. नवरात्रोत्सवात ११ ऑक्टोबर रोजीची अष्टमी व २० ऑक्टोबर रोजीची नवमी, तर दीपावलीमध्ये ८ नोव्हेंबर रोजीचे लक्ष्मीपूजन, २५ डिसेंबर रोजीचा ख्रिसमस व ३१ डिसेंबर या दिवशीदेखील ध्वनिक्षेपकासाठी सूट देण्यात आली आहे. उर्वरित दोन दिवसांसाठी राज्य शासनाच्या अटींच्या अधीन राहून आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने परवानगी देता येईल.
अवश्य वाचा : युनुस सय्यद यांच्या ‘इनुची गोष्ट’ला राज्य शासनाचा सर्वोच्च वाङ्मय पुरस्कार जाहीर
तरतुदींचे पालन करणे बंधनकारक (Collector)
या उत्सव काळात ध्वनी प्रदूषण नियम २००० मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. पोलीस प्रशासनाने शांतता क्षेत्राची माहिती घेऊन ध्वनीचे नमुने घ्यावेत व याबाबतची नोंद पंचनामा करून ठाणे दैनंदिनीमध्ये करावी. ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वसामान्य जनतेची तक्रार आल्यास घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष ध्वनीची तीव्रता मोजावी व छायाचित्रण करावे. मोजलेली तीव्रता विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास अहवाल उचित प्राधिकरणाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.



