Collector : नगर : स्पर्धांच्या माध्यमातून कामाचा ताण कमी होऊन नवी ऊर्जा अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळते, तसेच त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे अशा स्पर्धांचे नियमितपणे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी (Collector) सालीमठ यांनी व्यक्त केली. नगरविकास विभागांतर्गत जिल्हा नगरपरिषदस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा (Sports Competition) व सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
नक्की वाचा : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार,नितीन गडकरींची घोषणा
खेळामुळे मानवी जीवनातील ताण-तणाव कमी होण्यास मदत
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा सहआयुक्त प्रशांत खांडकेकर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले, खेळामुळे मानवी जीवनातील ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताण असतो. त्यातून खेळासाठी वेळ काढल्यास जीवनातील आनंद घेता येतो. या क्रीडा स्पर्धांपुरता आपला खेळ मर्यादित न ठेवता यापुढे आपण सातत्याने दररोज काही वेळ स्वतःसाठी काढून आपले कौशल्य आणि छंदाची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी केले.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
राहुरी नगरपरिषदेने सर्वाधिक पारितोषिके पटकावले (Collector)
मान्यवरांच्या हस्ते ३२ क्रीडा प्रकार आणि ९ सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेत सहभागी सर्व नगरपरिषदांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. राहुरी नगरपरिषदेने सर्वाधिक पारितोषिके पटकावले. त्या खालोखाल श्रीरामपूर आणि देवळाली नगरपरिषदेने यश संपादन केले.
नगरपरिषदस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन (Collector)
राज्याच्या क्रीडा धोरणास अनुसरून नगरविकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा नगरपरिषदस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. २७ ते २९ डिसेंबर २०२४ कालावधीत राहुरी कृषी विद्यापीठात करण्यात आले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील १५ नगरपरिषदा व नगरपंचायती तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेत कार्यरत अधिकारी – कर्मचारी अशा एकूण ९७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ३९ क्रीडा व सांस्कृतिक प्रकारात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी विविध समित्यांची व उप समित्यांची स्थापना करण्यात आली होती. नियोजन समिती सदस्य सचिव म्हणून देवळाली प्रवरानगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी काम पाहिले. यावेळी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आणि अहिल्यानगर महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त, स्पर्धक खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.