Politics : संगमनेर: तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी (ता.२५) माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांची सभा झाली. सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांनी डाॅ. जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) कार्यकर्ते आक्रमक होऊन तालुक्यात काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडून जाळून टाकण्यात आल्या आहेत. काही वेळ सभास्थळी ठिय्या करत रात्रभर माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यासह डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गा तांबे यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्त्यांकडून तालुका पोलीस ठाण्याच्या आवारत बसून त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
नक्की वाचा: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर
आक्षेपार्ह टीका करत अवमान (Congress)
विधानसभेच्या निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अत्यंत आक्रमक वक्तव्यामुळे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सभा गाजत आहेत. शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गटात झालेल्या सभेच्या सुरुवातीला सभेचे अध्यक्ष वसंत देशमुख यांनी युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह टीका करीत त्यांचा अवमान केला. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट व्यासपीठावर चाल करून देशमुख व सुजय विखे यांना जाब विचारला. या सभेचा वृत्तांत तालुक्यात पसरल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे तीव्र पडसाद उमटले. त्यांनी धांदरफळ येथुन येणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या सात ते आठ गाड्या फोडून जाळपोळ केली. त्यानंतर गाडीतून उतरणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना अकोले नाका परिसरातील पुलाखाली, खांडगाव दुध डेअरीसमोर चिखली येथे घडली. यानंतर तालुका पोलीस ठाणे येथे ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली.
अवश्य वाचा: माझ्यावर हल्ला करण्याचा कट : सुजय विखे पाटील
गाड्यांची तोडफोड, जाळपोळ झाल्याने भीतीचे वातावरण (Congress)
संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची माहिती मिळताच, पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधिक्षक यांनी सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना तातडीने शहरात बोलावून घेतले. शहरात पोलीस पेट्रोलिंग लावण्यात आली, त्यामुळे, शहरात अनुचित घटना टळली. तरी देखील काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान शेकडो महिला कार्यकर्त्यांनी या बदनामीबद्दल वसंत देशमुख व सुजय विखे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले. अखेर रात्री दहा वाजता सुरु झालेले ठिय्या आंदोलन सकाळी साडेसात वाजेपर्यंत गुन्हे दाखल झाल्यानंतर संपले. मात्र आरोपींना अटक न केल्याने शनिवारी (ता. २६) सकाळी कॉंग्रेसचे हजारो कार्यकर्त्यांनी आरोपींना अटक करा आणि पोलीस अधीक्षकांना समोर बोलवा, यासाठी पुन्हा आंदोलन करून ठिय्या दिला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत अधीक्षक यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून जवळपास बारा टीम तयार करून आरोपीच्या शोधासाठी पाठविण्यात आल्या आहे. लवकरात लवकर आरोपीला अटक करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी माघार घेत अखेर आंदोलन स्थगित केले.