नगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अगोदर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला निरोप दिला.
नक्की वाचा : शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पक्ष व चिन्हांची नावे आली समोर
मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते समजले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. १० फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती.
अवश्य वाचा : ऑस्ट्रेलियात खासदाराची ‘भगवत’ गीतेच्या साक्षीने शपथ
सिद्दीकी यांनी ट्विटमध्ये काय सांगितले ? (Baba Siddique)
ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो होतो. हा ४८ वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला व्यक्त व्हायला खूप काही आवडले असते पण ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.
बाबा सिद्दीकी कोण आहेत ? (Baba Siddique)
झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जातात. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खाती देखील सांभाळली आहेत. २०००-२००४ या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.