Copy Case | पाथर्डी : येथील बारावीच्या एका परीक्षा (examination) केंद्रामध्ये निलंबित नायब तहसीलदार हा आपल्या मुलाला कॉपी देण्यासाठी (Copy Case) अनधिकृतरित्या परीक्षा केंद्रामध्ये दाखल झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. केंद्र संचालक शिवाजी दळे यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात अनिल तोरडमल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अनिल तोरडमल असे गुन्हा दाखल झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे.
नक्की वाचा : ‘पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत आरोपीवर कठोर कारवाई होईल’- एकनाथ शिंदे
पदाचा दूरुपयोग (Copy Case)
सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड व अॅड. हरिहर गर्जे यांनी हा धक्कादायक प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवेतून निलंबित असलेला नायब तहसीलदार अनिल तोरडमल याने पदाचा दूरूपयोग करून परीक्षेमध्ये कॉपी पुरवण्याचे काम केले, असा आरोप त्यांच्यावर आता झाला आहे.
अवश्य वाचा : प्रयागराजमधील महाकुंभात ६५ कोटी भाविकांनी केले स्नान
गुरुवारी (ता.२७) बारावीचा बायोलॉजीचा पेपर पाथर्डी येथील तनपुरवाडीच्या परीक्षा केंद्रामध्ये सुरू होता. त्यावेळी तोरडमल हा स्वतःच्या गळ्यात ओळखपत्र घालून बसलेला होता. तोरडमल याचा मुलगा या ठिकाणच्या परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देत आहे. वास्तविक पाहता परीक्षा केंद्रामध्ये शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षक व पेपर तपासणीसाठी असलेले भरारी, बैठे पथकाव्यतिरिक्त कोणालाही परवानगी नसते. मात्र, अनिल तोरडमल याचे यापूर्वीच सेवेतून निलंबन झाले असून त्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शासकीय जबाबदारी देण्यात आली नव्हती. असे असताना पदाचा दुरुपयोग करून त्याने शासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारे कृत्य केले आहे.
मुलासाठी बाप परीक्षा केंद्रात (Copy Case)
मिळालेल्या माहितीनुसार तोरडमल हा बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून आपल्या मुलाला परीक्षेत फायदा मिळावा म्हणून आपल्या पदाचा दुरुपयोग करून या परीक्षा केंद्रात वावरत होता. त्याने महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र घालून आपण कार्यरत अधिकारी आहोत, असे भासवून मुलाला कॉपी पुरवण्याचे काम केले आहे, असा आरोप होत आहे. तोरडमल याच्यावर परीक्षा केंद्रामधील काही शिक्षकांना संशय आल्याने याची पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली.

तोरडमल याची पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यात परीक्षा संदर्भात कोणतेही सरकारी काम नसताना तो मुलाला कॉपी पुरवण्यासाठी या ठिकाणी परीक्षा केंद्रात आढळून आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर या निलंबित नायब तहसीलदारचे बिंग फुटले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे परीक्षा केंद्रामध्ये दाखल झाले. त्यांनी निलंबित तहसीलदार तोरडमल यांची कसून चौकशी केली. तोरडमल हे निलंबित असताना अनधिकृतपणे परीक्षा केंद्रामध्ये येऊन कॉपी पुरवत असल्याने प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.