Crime : नगर : श्रीगोंदा तालुक्यात रस्तालूट (Crime) करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून चार लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला.
अवश्य वाचा: शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल
पथकाने टोळीतील किरण उत्तम लोंढे (वय २२, रा. महालक्ष्मी चौक, काष्टी, ता. श्रीगोंदा), ओम शांतराम धोत्रे (वय २४, रा. दत्तनगर, काष्टी, ता. श्रीगोंदा), रोहित साहेबराव शिंदे (वय २०, रा. बजरंगनगर, काष्टी, ता. श्रीगोंदा), किरण लक्ष्मण गायकवाड (वय २१, रा. बजरंगनगर, काष्टी, ता. श्रीगोंदा), सुनील शिवाजी लोणारे (वय २१, रा. कायनेटिक चौक, केडगाव, अहिल्यानगर), राहुल उत्तम काळे (वय १९, रा. भिंगार, अहिल्यानगर), निखील अश्विन घोरपडे (वय २०, माधवबाग, भिंगार, अहिल्यानगर) व अक्षय अण्णासाहेब कोबरणे (वय २५, रा. दूधसागर सोसायटी, केडगाव, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांचे दोन साथीदार अल्ताफ नूरमोहंमद आतार (रा. भैरवनाथ चौक, काष्टी, ता. श्रीगोंदा) व योगेश रमेश शिंदे हे पसार आहेत. त्यांचा शोध पथक घेत आहे.
नक्की वाचा: एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ
दौंड (जि. पुणे) येथील किराणा मालाचे व्यापारी अभय मांडोत हे श्रीगोंदा तालुक्यात किराणा मालाचा टॅम्पो घेऊन माल विकत असतात. मांडोत यांचा टॅम्पो गुरुवारी (ता. २४) टाकळी लोणार (ता. श्रीगोंदा) येथे आला होता. त्यावेळी टॅम्पो अडवत काही व्यक्तींनी त्यांना गावठी पिस्तुलीचा धाक दाखवत त्यांच्या जवळील तीन लाख ६० हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेले. या संदर्भात त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. श्रीगोंदा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. त्यानुसार पथकाने घटनास्थळाला भेट देत तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, हा गुन्हा किरण लोंढे व त्याच्या साथीदारांनी केला आहे. तो काष्टीवरून अहिल्यानगरला साथीदारांसह दुचाकीवरून निघाला आहेत. त्यानुसार पथकाने पारगाव फाटा येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दोन लाख रुपये रोख, गावठी पिस्तुल व तीन दुचाकी असा चार लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने आरोपींकडून हस्तगत केला आहे. पथकाने पुढील तपासासाठी आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.