Crime : संगमनेर: पोलीस (Police) ठाण्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. यात आरोपींमध्ये पुरुष- महिला, मुला-मुलींचा समावेश असतो किंवा अज्ञाताविरोधात गुन्हा (Crime) दाखल केला जातो. एकंदरीत काय, तर मानवी समूहातीलच व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. मात्र, गेल्या आठवड्यात अजब प्रकार घडला असून, संगमनेर (Sangamner) शहर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरच्या परदेशी वाण असलेल्या कुत्र्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तपासही सुरू केला आहे.
नक्की वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
महिलेने दिलेल्या जबाबावरून पाळीव कुत्र्याविरोधात दाखल
गेल्या बुधवारी घडलेल्या या प्रकारासंदर्भात रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेने दिलेल्या जबाबावरून पाळीव कुत्र्याविरोधात दाखल झालेल्या या गुन्ह्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘आरोपी’ मध्ये एका पाळीव कुत्र्याचा (प्राण्याचा) समावेश असल्याने पोलीस या प्रकरणी नेमका काय तपास करतात, याकडे लक्ष लागले आहे.
अवश्य वाचा : अन्यथा आकाशवाणी केंद्राला टाळे ठोकू : अभिजीत खोसे
कुत्रा अंगावर धावून आल्याने अपघातात (Crime)
संगमनेर शहरालगत घुलेवाडी शिवारात असलेल्या एका मळ्याच्या परिसरात गेल्या बुधवारी दुपारी ही घटना घडली. यासंदर्भात रविवारी पोलिसांनी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना एका महिलेने दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी महिला ही शहरालगत असलेल्या घुलेवाडी शिवारात कुटुंबासह राहावयास आहे. तेथेच हे डाॅक्टर राहावयास असून, त्यांच्याकडे ‘रॉटविलर’ जातीचा पाळीव कुत्रा आहे. हा कुत्रा फिर्यादी महिलेच्या घराच्या परिसरातील नागरिकांच्या अंगावर धावून जातो. बुधवारीदेखील (ता.१५) दुपारी फिर्यादी महिला दुचाकीवरून घरी येत असताना घराजवळ असलेल्या हा पाळीव कुत्रा गेटमधून फिर्यादी महिलेच्या अंगावर धावून आला. त्यामुळे फिर्यादी महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात महिलेला मार लागून ती जखमी झाली. हा अपघात कुत्रा अंगावर आल्याने झाल्याचे म्हटले आहे. पोलीस ठाण्यात यासंदर्भात या पाळीव कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार गजानन वाळके पुढील तपास करीत आहेत.