Criminal : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील महांडुळवाडी येथे घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना (Criminal) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केले. त्यांच्याकडून ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विजयकुमार जयकुमार सोनीगरा (वय ३५, रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) व योगेश अरुण कसबे (वय २९, रा. हातगाव, ता. केज, जि. बीड) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : बाळासाहेब थोरात
महांडुळवाडी येथील कांतीलाल घाडगे यांच्या घरातील दरवाजाचा ४ ऑक्टोबरला रात्री कडी कोयंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरामधील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला. या संदर्भात घाडगे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
नक्की वाचा : संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; खासदार सुजय विखेंनी मांडली भिंगारकरांची बाजू
या गुन्ह्यातील आरोपींबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने नगर-दौंड रस्त्यावरील निमगाव खलू येथे एका दुचाकीवर जात असलेल्या दोन जणांना थांबण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पसार होण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांचा पाठलाग करत जेरबंद केले. पथकाने अधिक विचारपूस केली असता आरोपींनी महांडुळवाडी येथील गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा सोनू पवार (वय ३५, रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) याच्या मदतीने केल्याचे सांगितले. सोनू पवार पसार आहे. त्याचा शोध पथकाकडून सुरू आहे. जेरबंद दोन्ही आरोपींकडून चोरीचे नऊ ग्रॅम सोन्याचे दागिने व दुचाकी असा ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विजयकुमार सोनीगरा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नगर जिल्ह्यात एक तर पुणे जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल आहेत.