नगर : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२४ च्या (IPL 2024) २९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) घरच्या मैदानावर पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला. चेन्नईने दिलेल्या २०७ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ६ बाद १८६ धावाच करू शकला. मुंबईच्या पराभवामुळे रोहित शर्माचे झंझावती शतक वाया गेले. या सामन्यात रोहित शर्माने ६१ चेंडूत १०० धावा केल्या. मात्र पथिरानाच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे इतर फलंदाज टिकू शकले नाहीत. पथिरानाने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत चार विकेट घेतले. या सामन्यात सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद करणे ही चेन्नईसाठी महत्त्वाची गोष्ट ठरली.
नक्की वाचा : ‘ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली तर मोदींना गोल्ड मेडल मिळेल’- संजय राऊत
रोहित शर्माने शेवटच्या चेंडूपर्यंत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण चेन्नईचा संघ आणि पथिरानाची गोलंदाजी मुंबईवर भारी पडली. धोनीच्या अखेरच्या षटकातील ३ षटकारांच्या जोरावर संघाने २०७ धावांचा आकडा गाठला. चेन्नईच्या डावात मुंबईसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिकच्या षटकात एकूण २६ धावा झाल्या. यातील धोनीने सलग ३ षटकार मारले आणि शेवटच्या चेंडूवर २ धावा केल्या. धोनीमुळेच चेन्नईला २०० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. हे शेवटचं षटक मुंबईसाठी चांगले भारी पडले.
रोहित शर्माचे झंझावती शतक व्यर्थ (CSK vs MI)
इशान किशनने रोहितसोबत फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली.पण इशान पथिराना कडून २३ धावा करत बाद झाला. त्याच षटकात सूर्याही खाते न उघडता बाद झाला. रोहित आणि तिलकने ५० धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला पण तिलक ३१ धावा करत झेलबाद झाला. पथिरानाने मुंबईच्या ३ मोठ्या फलंदाजांना बाद केल्याने संघ बॅकफूटवर केला. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या २ धावा करत बाद झाला तर डेव्हिडने सलग दोन षटकार लगावत सर्वांच्या आशा पल्लवित केल्या, पण त्यानेही ५ चेंडूत १३ धावा केल्या. तर शेफर्डही १ धावा करत क्लीन बोल्ड झाला. सगळे फलंदाज बाद होत असतानाच रोहित शर्मा एका टोकाला पाय रोवून घट्ट उभा होता, पण इतर फलंदाजांची रोहितला साथ न मिळाल्याने त्याने शतक झळकावूनही संघाला विजय मिळविता आला नाही.
अवश्य वाचा : ‘रीलस्टार’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे
पथिराना ठरला गेमचेंजर (CSK vs MI)
चेन्नईकडून सामनावीर ठरलेल्या पथिरानाने ४ षटकांत २८ धावा देत ४ विकेट्स घेतले. तर तुषार देशपांडे आणि शार्दुल ठाकूरने एक एक विकेट मिळवली. नाणेफेक गमावून चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावा केल्या. यावेळी चेन्नईने अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र या जोडीला सलामीसाठी धाडले. पण रहाणे एका चौकारासहित पाच धावा करत बाद झाला. त्यानंतर रचिन रवींद्र १६ चेंडूत २१ धावा करत आऊट झाला.
कर्णधार ऋतुराजच्या ६९ धावा आणि सातत्याने फॉर्ममध्ये असलेल्या शिवम दुबेच्या ६६ धावांच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर संघाने १५० अधिक धावा केल्या. तर मिचेलनेही १४ चेंडूत १७ धावा केल्या. सुरूवातील मुंबईने धावांवर अंकुश ठेवला खरा पण शेवटपर्यंत तो कायम राखण्यात अपयशी ठरले. त्यानंतर धोनीने ५०० च्या स्ट्राईक रेटने ४ चेंडूत अविश्वसनीय २० धावा करत संघाच्या विजयाचा पाया भक्कम केला. मुंबईकडून हार्दिक पंड्याने ३ षटकांत २ विकेट घेत ४३ धावा दिल्या. तर गेराल्ड कोएत्झी आणि श्रेयस गोपाल यांना १ विकेट मिळाली.