नगर : आयपीएलच्या २०२४ मधील ४६ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात पार पडला. चेन्नईच्या होम ग्राऊंडवर दोन्ही संघ आमने सामने आले होते. सनरायजर्सचा कर्णधार पॅट कमिन्सनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. तर चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ३ बाद २१२ धावा केल्या.
चेन्नईच्या डावात कॅप्टन ऋतुराज गायकवाड च्या ९८ धावा आणि डॅरिल मिशेलंच्या ५२ धावा महत्त्वाच्या ठरल्या. चेन्नईनं केलेल्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग सनरायझर्स हैदराबादला करता आला नाही. हैदराबादचा संघ १३४ धावाच करु शकला. चेन्नई सुपर किंग्जने अशा प्रकारे स्पर्धेतील पाचव्या विजयावर नाव कोरलं आहे.
नक्की वाचा : लाेकसभा निवडणुकीत विराेधकांचा सुफडा साफ हाेणार : सुजय विखे
हैदराबादचा दुसरा पराभव (CSK vs SRH)
सनरायजर्स हैदराबा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा हा चौथा तर सलग दुसरा पराभव ठरला. चेन्नई सुपर किंग्जनं विजयासाठी समोर ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. तुषार देशपांडेनं दुसऱ्याच ओव्हरमध्ये हैदराबादच्या ट्रेविस हेडला बाद केलं. यानंतर लगेचच त्यानं अनमोलप्रीत सिंहला शुन्यावर बाद केलं. तुषार देशपांडे यानेच त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माला बाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला. या धक्क्यांमधून हैदराबादचा संघ सावरु शकला नाही. यानंतर मार्क्रम आणि नितीशकुमार रेड्डी डाव सावरतात असं वाटत असतानाच हैदराबादला चौथा धक्का रवींद्र जडेजानं दिला. जडेजानं नितीशकुमार रेड्डीला आऊट केलं. त्यानंतर हैदराबादचे फलंदाज क्रमाकमानं बाद होत गेले आणि त्यांचा संघ १३४ धावांवर बाद झाला.
तुषार देशपांडेमुळे हैदराबादची फलंदाजी कोलमडली (CSK vs SRH)
मराठमोळ्या तुषार देशपांडेनं हैदराबादला दुसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये एकूण तीन धक्के दिले. हैदराबादचे सलामीवर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा या दोन्ही सलामीवीरांना तुषार देशपांडेनं बाद केलं. याशिवाय अनमोलप्रीतसिंहला देखील बाद केलं. यानंतर चेन्नईच्या मराठमोळ्या बॉलरनं हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सला देखील बाद करुन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तुषार देशपांडेनं चार विकेट घेतल्या,मुस्तफिजूर रहमान आणि मथिशा पथिरानानं प्रत्येकी दोन आणि रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी एक एक विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करताना होमग्राऊंड असलेल्या चेपॉक वर २१२ धावा केल्या. चेन्नई कडून ऋतुराज गायकवाडनं ९८ धावांची खेळी केली. डॅरिल मिशेलनं ५२ आणि शिवम दुबेनं ३९ धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड २० व्या ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.