नगर : बीड, धाराशिव जिल्ह्यात आंदाेलनाला हिंसक वळण लागले आहे. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची (S T Bus) बस जाळण्यात आली. यामुळे कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बीड, धारशिव जिल्ह्यात संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे, असे आदेश संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) लागू केले आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे.
हे देखील वाचा : नेत्यांच्या फोटोला जोडे मारुन फासले काळे
मराठा समाजास सरसकट कुणबी दाखले देण्याबाबत राज्यभर धरणे आंदाेलन, रास्ता राेकाे, उपाेषण आदी आंदाेलन सुरू आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी शांततेच आंदाेलन सुरू असताना बीड, धाराशिव जिल्ह्यात आंदाेलनाला हिंसक वळण लागले आहे. उमरगा तालुक्यातील तुताेरी येथे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस जाळण्यात आली. ठिकठिकाणी जाळपाेळीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे.
नक्की वाचा : आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम काेर्टाचे कठाेर पाऊल; ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश
संचारबंदीचे आदेश शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, आस्थापना यांनाही लागू राहतील. या कालावधीत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच काेणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फाेटके साेबत बाळगता येणार नाही. शासकीय-निमशासकीय कार्यालये, दूध वितरण, पिण्याचे पाणी पुरवठा, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था यांना या आदेशात सूट दिली आहे.
दरम्यान, राज्यभरात मध्यरात्रीपासून या मराठा आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. एसटी बसेस तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांना आग लावण्याचे, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले करण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी कार्यालयांवर दगडफेक करून आग लावण्याचे प्रकार घडले. फोटोंना काळे फासण्यात आले, शासकीय आणि खासगी कार्यालयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बीडमध्ये आजपासून एसआरपीएफ पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. मुख्यमंत्री यांनी मराठवाडातील परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून घेतला. गरज पडल्यास संपूर्ण मराठवाड्यात एसआरपीएफ आणि इतर बंदोबस्त लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली होती. आता या प्रकरणी तोडफोड करणाऱ्या आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.