Dada Kalamkar : नगर : भाजप (BJP) सरकारने शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक केली आहे. अतिवृष्टी, बाजारभावाचा अभाव आणि शेतमालाची घसरण यामुळे शेतकरी उभा राहू शकत नाही. सरकारला शेतकऱ्यांचा फायदा नाही, फक्त मोजक्या उद्योगपतींची काळजी आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)(Nationalist Congress Party (Sharad Chandra Pawar Group) रस्त्यावर उतरून लढेल. व राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्या संकटकाळात झाली, त्यावेळी कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले. आजही त्याच एकतेची आणि जिद्दीची गरज आहे.
अवश्य वाचा : शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचा यू-टर्न
बुथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करा
प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात, विभागात ताकदीने काम करावे. बुथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करा. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मत चोरी आणि बाहेरील मते आणून सत्ता काबीज केली. यावेळी आपण सजग राहून प्रत्येक मत सुरक्षित ठेवणे हीच खरी लढाई आहे. उमेदवार असो वा कार्यकर्ता प्रत्येकाने जबाबदारीने काम केल्यास जिल्हा परिषदेपासून, पंचायत समिती व महापालिकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे फडकतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर (Dada Kalamkar) यांनी व्यक्त करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (शरदचंद्र पवार गट) अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याची आढावा बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी : माणिक आहेर
जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित (Dada Kalamkar)
यावेळी बाबासाहेब भोस, उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, प्रताप ढाकणे, अरुण पाटील कडू, रावसाहेब म्हस्के, जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, नगर तालुकाध्यक्ष शरद पवार, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव तालुकाध्यक्ष हरिष भारदे, युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे, महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे, युवती जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे, किसनराव लोटके, विजय मोढळे, सुरेश भोसले, रघू काळदाते, प्रकाश पोटे, नलिनी गायकवाड, सुवर्णा धाडगे, सुधीर म्हस्के, केशव बेरड, संजय वराट, फारुक रंगरेज यांचेसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत प्रत्येक तालुक्याचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. सर्व तालुकाध्यक्षांनी येणाऱ्या निवडणुकांबाबत तयारीचा अहवाल सादर केला. कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीच्या बळावर निवडणुका लढवून राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व स्तरावर यश मिळवून देण्याचा निर्धार दिसून आला.
यावेळी भोस म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांची विचारधारा म्हणजे संघर्ष प्रामाणिकपणा आणि विकास प्रत्येक कार्यकर्त्यांनी मीच राष्ट्रवादी ही भावना मनात ठेवून काम केले पाहिजे. पक्षाचे बळ हे फक्त मोठ्या नेत्यांमुळे नसते ते तळागाळातील कार्यकर्त्यांमुळे उभे राहते, आज समाजात असंतोष आहे, बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी संकटात आहे अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच एकमेव पर्याय ठरते आपण एकजुटीने आणि नियोजनबद्धपणे काम केल्यास जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा प्रत्येक गावात फडकणार असल्याची भावना व्यक्त केली.
प्रताप ढाकणे म्हणाले की, महाराष्ट्रात विकासाची नवी दिशा दिली त्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सजग राहावे. आता पक्ष फक्त राजकारणापुरता नको, तर सामाजिक कार्य शेतकरी महिला युवकांनी शिक्षण क्षेत्रात सक्रिय राहिला पाहिजे, भाजपचे खोटे आश्वासन आता जनतेला पटेनासे झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता राष्ट्रवादी काँग्रेस कडे पाहत आहे. यावेळी महिला, युवक, युवती, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय विभागांचे प्रतिनिधी यांनी देखील संघटनवाढ, आणि मतदारसंघातील जनसंपर्क मोहीम वाढवण्याचे नियोजन सादर केले.



