Dada Patil Mahavidyalaya : कर्जत : महिलांनी स्वत:कडे अबला म्हणून पाहिल्यास समाज देखील तिला अबलाच समजतो. त्यामुळे प्रथम आपल्यातील आत्मविश्वास जागृत करा आणि सक्षम म्हणून जगात वावरा. विधवा महिलांना पूर्वांगिनी म्हणून जगावे लागते. विधवांना घरापासूनच संघर्ष करावा लागतो. मात्र, ती संघर्षातून कणखर बनून स्वतःचे स्थान निर्माण करते. स्वत:ला कधीच अबला न समजता सक्षमच समजावे, असे प्रतिपादन सारिका धनराज परहर यांनी केले. दादा पाटील महाविद्यालयाच्या (Dada Patil Mahavidyalaya) ‘तेजस्विनी मंच व महिला सबलीकरण कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन (International Women’s Day) आयोजित एकल महिला सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.
नक्की वाचा : महाकुंभमेळ्यात ४५ दिवसांत बोट व्यावसायिक कुटुंबानं कमावले ३० कोटी
प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले, मुलीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मसन्मान असेल तर स्त्रीपणाचे सोने होते. समाज नेहमी तू स्त्री आहे, याची सातत्याने जाणीव करून देत असतो. वर्षभर महिला सक्षमीकरण व सबलीकरण काळाची गरज बनली आहे. परिस्थितीतून धाडस निर्माण होते. अश्रू गोठवण्याची ताकद निर्माण करा. स्त्री सन्मानाची भुकेली असते. सन्मान मिळवायचा असेल तर सक्षम म्हणून स्वत:च्या पायावर उभे राहा. निसर्गाने जगात सर्वात सुंदर निर्माण केलेली वस्तू म्हणजे स्त्री आहे. तिचा कायम सन्मान केला पाहिजे.

अवश्य वाचा : शेतकऱ्याने लाडक्या ‘नंद्या’ बैलाचा केला दशक्रिया विधी
मुलींनो भरकटून जाऊ नका (Dada Patil Mahavidyalaya)
यावेळी लंका श्रीराम पठाडे यांनी आपल्या जीवनाची संघर्ष कहाणी कथन केली. विधवापण काय असतं आणि मी कसे भोगत आले आहे याची कहाणी त्यांनी उपस्थितांना सांगितली. मुलींनो भरकटून जाऊ नका. परिस्थितीची जाणीव ठेवा. महिला म्हणून आपली पत आपणच विकसित करण्याचा सल्ला उपस्थित विद्यार्थिनीना दिला. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. जयश्री कांबळे यांनी आपल्या संघर्ष कहाणीचे वर्णन मांडले. श्रीमती उकिरडे यांनी विद्यार्थिनींना दृष्टांताद्वारे मोलाचा सल्ला दिला. वैष्णवी गायकवाड व प्रीती शिंदे यांनीही आपली जीवन कहाणी मांडली.या कार्यक्रमात ‘एकल महिला’ म्हणून मनीषा शांतीलाल जाधव, लंका श्रीराम पठाडे, राधिका परहर, सविता महादेव गांगर्डे, नंदा चंद्रभान शिंदे, रखमाबाई पंढरीनाथ पठाडे, शितल खराडे, संध्या दत्तात्रय नेवसे, माधुरी सुद्रिक, रोहिणी राजेंद्र सोनमाळी, सारिका धनराज परहर, मनीषा अमोल गोरे या एकल महिला उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व एकल महिला व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिकांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बेबी खिलारे, सूत्रसंचालन प्रज्ञा सरोदे हिने तर आभार डॉ. संगीता कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. आशा कदम, डॉ.संगीता कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.